Bhosari : सराईत चोरट्याकडून साडेआठ लाखांचे दागिने जप्त; 10 गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – सराईत सोनसाखळी चोरट्याकडून 8 लाख 48 हजार 800 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली. या कारवाईमुळे हिंजवडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक केलेला आरोपी ओळख लपविण्यासाठी नाव बदलून राहत होता.

समीर श्रीकांत नान्नजकर (वय 46, रा. खंडोबा मंदीर जवळ, भोसरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करीत रोषण गार्डन, भोसरी येथे सापळा लावून आरोपी समीर याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने 2017 पासून दहा ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आठ लाख 48 हजार 800 रूपयांचे 231 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

आरोपी समीर याने त्याच्या साथीदारासह भोसरीमध्ये तीन, भोसरी एमआयडीसीमध्ये पाच आणि हिंजवडीमध्ये दोन ठिकाणी चोरी केली आहे. तीन पोलीस ठाण्यातील एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. समीर याच्यावर निगडी, डेक्कन, लोणी काळभोर, एमआयडीसी लातूर, हडपसर पोलीस ठाण्यात वाहन चोरी आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याचे आठ गुन्हे दाखल आहेत. तो दोन वेळा वाताहत कारागृहात होता. तो मागील अनेक दिवसांपासून पोलिसांपासून ओळख लपविण्यासाठी स्वतःचे नाव बदलून वास्तव्य करीत होता. विनायक श्रीकांत नान्नजकर या नावाचे त्याने आधारकार्ड तयार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त आर. आर. पाटील, श्रीधर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सपोफौ रविंद्र राठोड, रविंद्र गावंडे, पोलीस कर्मचारी आप्पा लांडे, बाळु कोकाटे, अमित गायकवाड, मनोजकुमार कमले, अंजनराव सोडगिर, मारूती जायभाये, सचिन मोरे, प्रविण पाटील, विजय मोरे, प्रमोद गर्जे, विशाल भोईर, गणेश सावंत व तानाजी पानसरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.