Chinchwad Crime News : पिंपरी चिंचवड पोलिसांचे गुरुवारी पहाटे कोंबिंग ऑपरेशन; रेकॉर्डवरील, हिस्ट्रीशिटर, गुंड मवाली असणाऱ्या 81 जणांना अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या माध्यमातून शहरात गुरुवारी (दि. 19) मध्यरात्री बारा ते पहाटे पाच वाजताच्या कालावधीत कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. यात सर्व पोलीस स्टेशन, क्राईम युनिट, गुन्हे शाखेची सर्व पथके सहभागी झाली. यामध्ये रेकॉर्डवरील, हिस्ट्रीशिटर, गुंड मवाली असणाऱ्या 81 जणांना अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेचे युनिट एक ते पाच, खंडणी विरोधी पथक, दरोडा विरोधी पथक, शस्त्र विरोधी पथक यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पहाटे पाचपर्यंत हे कोंबिंग ऑपरेशन केले. यात गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तीन आरोपींना अटक केली. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 कलम 37(3) सह 135 प्रमाणे दोन गुन्हे दाखल केले. तसेच एक लोखंडी कोयता, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 56 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

रेकाॅर्डवरील 130 आरोपी चेक केले. त्यातील 60 आरोपी सापडले. हिस्ट्रीशिटर 52 आरोपी चेक केले. त्यातील 15 सापडले. गुंड, मवाली 18 चेक केले. त्यातील सहा सापडले तसेच तडीपार आरोपी 95, फरार आरोपी 12, पाहिजे आरोपी 84, जबरी चोरी करणारे पाच आरोपी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान चेक केले. यात  न सापडलेल्या गुन्हेगारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

गुन्हे शाखेप्रमाणेच पोलीस ठाण्यांकडूनही कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात रात्री उशिरापर्यंत विनाकारण फिरणाऱ्या पाच जणांवर, रात्री उशिरापर्यंत हाॅटेल सुरू ठेवल्याप्रकरणी 10 जणांवर तसेच गोंधळ घालत असलेल्या 15 आणि इतर सहा जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार पाच जणांवर कारवाई केली. तसेच दोन जणांना नॉन बेलेबल वॉरंटमध्ये अटक करण्यात आली आणि पाच जणांना ‘वाॅरंट’ बजावण्यात आले. तसेच भादंवि कलम 379 अन्वये एका आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.