Chinchwad : वर्षपूर्तीनंतरही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अडचणींच्या विळख्यातच

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची वर्षपूर्ती झाली. पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्रपणे सुरु झालेले आयुक्तालय सुरुवातीपासून अनेक अडचणींचा सामना करत आहे. वर्षभरात काही वाहने आणि काही पोलीस अधिकारी, कर्मचारी आयुक्तालयाला मिळाले. त्यावर आयुक्तालयाचा कारभार सुरु आहे. 15ऑगस्ट 2019 रोजी पोलीस आयुक्तालयाला एक वर्ष पूर्ण झाले. वर्ष सरले मात्र, अडचणी तशाच तळ ठोकून आहेत. अति वरिष्ठ पातळीवरून कानाडोळा होत असल्याने या अडचणी हटण्याचे नाव घेत नाहीत.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट 2018 रोजी सुरु झाले. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील काही भाग जोडून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाले. आयुक्तालयाच्या सुरुवातीपासून मनुष्यबळ, वाहने, जागा, इमारती आणि अन्य विविध प्रकारच्या अडचणी आ वासून उभ्या होत्या. या अडचणी वर्षपूर्तीनंतर देखील कायम आहेत. अनेक अडचणींचा सामना करून आयुक्तालय सुरु झाले. विविध विभाग सुरु झाले. महापालिकेच्या ऑटो क्लस्टरच्या इमारतीमधून सुरु झालेले आयुक्तालय चिंचवड येथे एका स्वतंत्र इमारतीमध्ये स्थलांतरित झाले. गुन्ह्यांच्या नोंदी वाढल्या. गुन्हेगारांची धरपकड सुरु झाली. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण त्याच प्रमाणात लहानमोठ्या सोने, मोबाईल, वाहन चोऱ्या वाढत गेल्या.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण 4 हजार 840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कडून 2 हजार 207 पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार होती. उर्वरित 2 हजार 633 पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत. नव्याने भरती करावयाची पदे तीन टप्प्यात भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 60 टक्के, त्यानंतर दोन वर्षांनी दुस-या टप्प्यात 20 टक्के आणि त्यानंतर दोन वर्षांनी तिस-या टप्प्यात 20 टक्के पदे भरली जाणार आहेत. मात्र, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातून मिळणारे पोलीस देखील आयुक्तालयाला मिळाले नाहीत. त्यामुळे सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी सुमारे दोन हजार पदांची आवश्यकता आहे.

मनुष्यबळाच्या बाबतीत जी परिस्थिती आहे, तीच परिस्थिती वाहनांच्या बाबतीत देखील आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाकडून मिळणारी वाहने अजूनही मिळाली नाहीत. मध्यंतरी पुणे पोलिसांनी वाहने देण्यास संमती दर्शवली मात्र, सर्व वाहने निकृष्ठ दर्जाची असल्याने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाने ती वाहने घेण्यास नकार दिला. दरम्यान, दोन कंपन्यांनी पुढाकार घेऊन प्रत्येकी पाच मोटारी आयुक्तालयाला कंपनीच्या सीएसआर फंडातून दिल्या. सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात 83 चारचाकी आणि 83 दुचाकी अशी एकूण 166 वाहने आहेत. सध्या 140 चारचाकी आणि 60 दुचाकी वाहनांची आयुक्तालयाला गरज आहे. शहरात धावणा-या 83 चारचाकी वाहनांसाठी किमान 180 चालकांची आवश्यकता आहे. मात्र सध्या केवळ 83 चालक उपलब्ध आहेत. यामुळे रात्रंदिवस पेट्रोलिंग करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सध्या खंडणी दरोडा विरोधी पथक, सायबर सेल, आर्थिक गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक, एमओबी, पीसीबी, महिला सहाय्यता कक्ष, औद्योगिक समन्वय कक्ष हे विभाग सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पोलीस स्टेशन स्तरावर पोलीस पथके, अँटी गुंडा स्क्वॉड, सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पथके अशी काही पथके वेळोवेळी स्थापन करण्यात आली आहेत. मुख्यालय तात्पुरत्या स्वरूपात निगडी येथे करण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता आहे. मनुष्यबळ, जागा, इमारत यांचा अभाव असल्यामुळे अजूनही दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्ब शोधक-नाशक पथक (बीडीएस), जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी), बँड पथक, मोटार परिवहन कार्यशाळा, शस्त्रागार, वस्त्र भांडार, सब्सीडीयरी (सीएसडी) कॅन्टीन, अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने, सायबर पोलीस स्टेशन, मुख्यालय, गुन्हे शाखा कार्यालये यांसारख्या अनेक गोष्टींची वानवा अजूनही आहेच.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सुरुवातीला 14 पोलीस ठाण्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर चिखली पोलीस ठाण्याची नव्याने सुरुवात करण्यात आली. जून 2019 मध्ये पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी रावेत, शिरगाव, म्हाळुंगे, बावधन या चार पोलीस चौक्या आणि तीन गुन्हे शाखांचा विस्तार केला. परिसरात पोलिसिंग वाढावी. ज्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी हा घाट घालण्यात आला. पण आहे त्याच मनुष्यबळात या चौक्या आणि गुन्हे शाखांच्या अधिकारी आणि कर्मचा-यांची तोडकी पूर्तता करण्यात आली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांची आकडेवारी वाढली आहे. मात्र खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या गुन्ह्यांवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले आहे. तर जबरी चोरी, विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. सरसकट सर्व गुन्हे दाखल करून घेण्यावर पोलीस आयुक्तांनी भर दिला असल्याने हे गुन्हे वाढले आहेत. पूर्वी मोबाईल हरवल्याची तक्रार घेतली जात असे. आता मात्र त्याचा गुन्हा नोंदवून घेतला जातो. त्यातील तांत्रिक बाबी तपासून गुन्हे दाखल करून घेण्याचे प्रमाण वाढवले आहे. तर दारूबंदी, अंमली पदार्थ विरोधी कारवाई, जुगार अड्ड्यांवर कारवाई, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर ऑगस्ट ते डिसेंबर 2018 पर्यंत 2 हजार 741 आणि जानेवारी ते जुलै 2019 या कालावधीत 9 हजार 331 असे एकूण वर्षभरात 12 हजार 72 गुन्हे दाखल झाले आहेत.

आयुक्तालयापुढे अनेक अडचणी आहेत. पण अडचणींना गोंजारून कायदा आणि सुव्यवस्था ढेपाळून चालणार नाही. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चिमुरड्याचा हात नसलेला मृतदेह आढळला. तर पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लहान मुलीचा मृतदेह आढळला. या दोन गुन्ह्यांची अजूनही पोलिसांना उकल झालेली नाही. हे डाग लवकरात लवकर पुसले जाणे आवश्यक आहे. सायबर पोलीस ठाणे, क्राईम इन्वेस्टीगेशन व्हॅन आणि आधुनिक तंत्रज्ञान नसल्यामुळे सायबर तपासात अडचणी येत आहेत. वरिष्ठ पातळीवरून काहीही ठोस पावले उचलली जात नाहीत. ‘चलता है चलने दो’ असे म्हणत वर्षपूर्ती झाली आहे. राजकीय, पोलीस प्रशासन पातळीवर हालचाली झाल्या तरच आयुक्तालय चांगल्या पद्धतीने चालणार आहे.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “शहरात गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यावर आमचा भर राहिला आहे. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी विविध पथके स्थापन केली आहेत. त्यांच्याकडून कारवाई केली जात आहे. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. औद्योगिक समन्वय ठेवण्यासाठी स्वतंत्र सेल निर्माण केली आहे. गुन्हे दाखल करून घेण्यावर विशेष भर दिला आहे. त्यामुळे आकडेवारी वाढलेली दिसेल. परंतु सर्व गुन्हे आता दाखल होत आहेत. अनेक गुन्हेगारांवर मोक्का, तडीपारीची कारवाई केली आहे. आयुक्तालय नवीन असल्याने काही अडचणी आहेत. पण त्यावर मात करून शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.