Pimpri : ऑटो क्लस्टरमध्ये होणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पहिले ध्वजारोहण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरासाठी नव्याने सुरु होत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार बुधवार (15 ऑगस्ट) पासून सुरु होणार आहे. आयुक्तालयाचे पहिले ध्वजारोहण चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे होणार आहे.

पहिल्या ध्वजारोहणासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पालकमंत्री गिरीश बापट, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, स्मार्तना पाटील, नम्रता पाटील, अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

बुधवारी (दि. 15) सकाळी दहाच्या सुमारास आयुक्तालयाचे ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर कंट्रोल रूमला कॉल करून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात येणार आहे. यानंतर उपस्थितांची एक बैठक पार पडणार आहे. आयुक्तालयासाठी मिळालेल्या प्रेमलोक पार्क येथील इमारतीचे नूतनीकरणाचे काम वेगात सुरु आहे. संपूर्ण काम होण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालय कार्यान्वित करण्यात येणार आहे. आयुक्तालयाची सर्व सूत्रे ऑटो क्लस्टर मधून हलणार आहेत.

ऑटो क्लस्टर मध्ये दोन केबिन आणि एक हॉल पालिकेने पोलीस आयुक्तालयासाठी दिला आहे. या ठिकाणी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांचे कार्यालय असणार आहे. सध्या पुणे शहर आयुक्तालयाचे परिमंडळ तीन पोलीस उप आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचे देखील नुतणीकरणाचे काम सुरु आहे. या कार्यालयात पोलीस उप आयुक्त बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.