Hinjawadi : हिंजवडीची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आता ‘वन वे’चा प्रयोग

पोलीस आयुक्तांची शिवाजी चौकात सरप्राईज व्हिजिट

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी हिंजवडी येथील शिवाजी चौकात सरप्राईज व्हिजिट दिली.  शिवाजी चौकासह हिंजवडी विभागात सुरू असलेल्या वाहतूक नियंत्रण याबाबत वाहतूक पोलिसांकडून माहिती घेतली. यावेळी हिंजवडी मधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी हिंजवडी मधील शिवाजी चौकात पीक अवर्समध्ये वन वे करण्याबाबत सूचना दिल्या. हा वन वे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी स्वतः चौकात उभा राहून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली. पुण्याकडून हिंजवडीकडे आयटी कंपन्यांमध्ये येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत. याचा स्थानिक नागरिकांना सुरुवातीला थोडा त्रास होणार असला तरी याचे दुरगामी परिणाम खूप चांगले असणार आहेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

पुणे-हिंजवडी या मार्गावर आज (सोमवारी) दुपारपासून वन वे बाबत काही बदल करण्यात आले होते, या बदलाबाबत पुणे-हिंजवडी या मार्गावर प्रवास करणारे आयटी प्रवासी कार चालक स्वप्नील तळपदे आणि दुचाकी चालक विशाल कुराडे यांना तात्पुरत्या बदलाबाबत आयुक्तांनी विचारले. बदल करण्यात आलेल्या मार्गावरून प्रवास करताना इतर दिवशी पेक्षा वेळ कमी लागल्याचे प्रवाशांनी आयुक्तांना सांगितले.

कार चालक स्वप्नील तळपदे यांनी सांगितले की, “हिंजवडी फेज तीन ते शिवाजी चौकापर्यंत येण्यासाठी दररोज अर्धा ते पाऊण तास लागतो, परंतु आज वाहतुकीत बदल केल्यामुळे 20 ते 25 मिनिटे वेळ कमी लागला.”

हिंजवडी वन वे
# सकाळी आठ ते अकरा
मार्ग – पुणे – हिंजवडी शिवाजी चौक मार्गे हिंजवडी एमआयडीसी, फेज 2, फेज 3 कडे

# सायंकाळी चार ते सात
मार्ग – हिंजवडी एमआयडीसी, फेज 2, फेज 3 कडून शिवाजी चौक मार्गे पुण्याकडे

# स्थानिक नागरिकांसाठी – शिवाजी चौकातून गावठाण मार्गे भूमकरवस्ती हा रस्ता वापरता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.