Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा मुहूर्त पुन्हा हुकणार ?

17 ऑगस्टला आयुक्तालय सुरु होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु होणार आहे. सुरुवातीला आयुक्तालय 1 मे रोजी सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यावेळी आयुक्तालयासाठी इमारत मिळाली नसल्याने पहिला मुहूर्त साधला गेला नाही. त्यानंतर चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची प्रशस्त इमारत पोलीस आयुक्तालयासाठी निश्चित करण्यात आली. 15 ऑगस्ट रोजी आयुक्तालय सुरु होणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र आयुक्तालयासाठी निश्चित केलेल्या इमारतीत आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. तसेच उदघाटन समारंभासाठी मुख्यमंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने पुन्हा आयुक्तालयाचा 15 ऑगस्टचा मुहूर्त हुकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरु आहे.

प्रेमलोक पार्क मधील शाळेची इमारत आयुक्तालयाला देण्यासाठी पालकांनी विरोध दर्शविला. त्यात काही राजकीय नेत्यांनी पालकांची समजूत घालायचा प्रयत्न केला, तर काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकांना आपल्या भूमिकेवर ठाम राहण्यास मदत केली. यामुळे प्रेमलोक पार्क येथील इमारतीमध्ये आवश्यक सोयी-सुविधा वेळेत पोहोचू शकल्या नाहीत. पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु करण्याची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असताना आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात महापालिका प्रशासनाचा नाकर्तेपणा उघड झाला आहे.

गुरुवारी (दि. 2) ऑटो क्लस्टर सभागृहात सह आयुक्त मकरंद रानडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे, पक्षनेते एकनाथ पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत ऑटो क्लस्टर येथून पोलीस आयुक्तालयाची सूत्रे तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यासाठी सहमती दर्शविण्यात आली आहे. पोलीस आयुक्त आणि सह आयुक्त यांचे कार्यालय इथे असणार आहे. प्रेमलोक पार्क येथील इमारतीमध्ये आयुक्तालयाचे काम सुरु करण्यासाठी किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

पहिले पोलीस आयुक्त आज पिंपरी-चिंचवड दौ-यावर

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन आज (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवड शहरामध्ये येणार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियोजित इमारतीची ते पाहणी करणार आहेत. प्रेमलोक पार्क येथील इमारतीच्या कामाची पाहणी करून वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.