Chinchwad News : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरात बालमजुरी विरोधी जनजागृती मोहिम सुरू

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विशेष बाल पथक, गुन्हे शाखा यांच्या मार्फत बालहक्क कृती समिती, पुणे व तेरे देस होम्स या सामाजिक संस्थेच्या मदतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुरुवार (दि. 12) पासून बालमजुरी विरोधी जनजागृती मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

बालकामगार अधिनियम 1986 अन्वये 14 वर्षांखालील मुलांना कामास ठेवण्यास प्रतिबंध आहे. विशेषतः 14 वर्षे खालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानिकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे तो कायदा मुलांच्या शारिरीक व मानसिक आरोग्यास हानिकारक मानले गेलेले व्यवसाय व धोकादायक समजल्या गेलेल्या प्रक्रियांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास मनाई करतो. तसेच ज्या आस्थापनांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे अशा सर्व कारखान्यांवर हा अधिनियम नियंत्रण ठेवतो. या कायद्याचे उल्लंघन करणा-यांवर 3 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत तुरुंगवास व त्या सोबतच द्रव्यदंडाची शास्ती कायद्यात देण्यात आली आहे.

या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरात विशेष बाल पथक गुन्हे शाखा यांच्या वतीने 3 दिवसीय “बालमजुरी विरोधी जनजागृती मोहिम” राबविण्यात येत आहे. या मध्ये हॉटेल, गॅरेज, गाडी धुणे, भंगार गोळा करणे, भाजीपाला विक्री व इतर आस्थापनांमध्ये लहान मुले काम करताना आढळल्यास तक्रार कोठे करायची या बाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी या अनुषंगाने बाल हक्क कृती समिती, पुणे यांच्या मार्फतीने बालमजूरी विरोधी अभियानसंदर्भात बनविण्यात आलेली विविध स्टिकर्स व माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.

18 वर्षां खालील मुलांना कामावर ठेवणार नाही अथवा कोणत्याही प्रकारच्या बालमजूरीस प्रोत्साहन देणार नाही या बाबत आस्थापना चालकांना शपथ देण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाच्या कामगार मंत्रालयाने पेन्सिल नावाने तयार केलेल्या वेबसाईटवर देशभरात कोणत्याही ठिकाणी बालमजुर आढळून आल्यास तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून दिल्याबाबत नागरिकांना माहिती करून देण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आपल्या सभोवतालच्या परिसरात बालकामगार आढळून आल्यास www.pencil.gov.in या वेबसाईटवर किंवा 1098 या चाईल्ड हेल्पलाईनवर माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बालमजुरी विरोधी जनजागृती मोहिम पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या संकल्पनेतून विशेष बाल पथक गुन्हे शाखा यांच्या मार्फतीने बालहक्क कृती समिती, पुणे व तेरे देस होम्स् या सामाजिक संस्थेच्या मदतीने राबविण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.