Chinchwad : सैन्य दलाकडून पिंपरी चिंचवड पोलिसांचा सत्कार; लष्कराकडून कोरोना योद्ध्यांना मानवंदना

एमपीसी न्यूज – भारतीय सैन्य दलाच्या वतीने कोरोना विषाणूशी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लढाई लढणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांचा सत्कार करण्यात आला.  लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (दि. 3) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करत सर्व कोरोना योद्ध्यांना मानवंदना दिली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमासाठी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील, श्रीधर जाधव आदी उपस्थित होते.

देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. याकाळात सगळे घरी आहेत. मात्र पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी नित्यनेमाने आपली सेवा देत आहेत. खऱ्या अर्थाने ते कोरोना योद्धा आहेत. दरम्यान त्यांच्या सन्मानासाठी भारतीय सैन्य दलाने रविवारी संपूर्ण देशभरात आकाशातून पुष्पवृष्टी करत कोरोना यौद्धांचा सन्मान केला.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतीय सैन्य दलाच्या विशेष विमानाने पुष्पवृष्टी करण्यात आली. पुण्यातही कोरोनावर उपचार करणा-या रुग्णालयावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि सफाई कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी भारतीय सैन्य दलाने हा विशेष उपक्रम राबविला आहे. पोलीस आयुक्तांच्या दालनात झालेल्या कार्यक्रमात केक कापून सैन्य दालने पोलिसांचे आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.