Chinchwad News : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सेवा, एक्स ट्रॅकर उपक्रमाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सेवा उपक्रम, एक्स ट्रॅकर उपक्रम आणि विविध सोशल मीडिया पेजेसचा लोकार्पण सोहळा आज (शुक्रवारी, दि. 5) चिंचवड येथे पार पडला. तसेच या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस ठाण्यांना आयएसओ मानांकन मिळाल्याचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, खेडचे आमदार दिलीप मोहिते, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आदी उपस्थित होते.

नागरिक जेंव्हा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कारणांसाठी येतात तेंव्हा त्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी येतात. त्यावर मार्ग काढून पोलिसांच्या कामातील तत्परता आणण्यासाठी सेवा उपक्रम राबविला जात आहे. पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांची माहिती ऑनलाइन माध्यमातून घेतली जाईल. ती नियंत्रण कक्षात पाठवली जाईल. नागरिकांना पोलिसांकडून मिळालेल्या सेवेबाबत फॉलोअप नियंत्रण कक्षातून घेतला जाईल. त्यानुसार नागरिकांना मार्गदर्शन आणि पोलिसांच्या सेवेचा दर्जा तपासला जाणार आहे.

सराईत गुन्हेगारांवर पिंपरी चिंचवड पोलीस स्मार्ट पद्धतीने लक्ष ठेवणार आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून एक्स ट्रॅकर हे नवीन अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. तडीपार केलेल्या गुन्हेगारांना त्यांचे रोजचे अपडेट या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पोलिसांना द्यावे लागणार आहेत. तडीपार केलेल्या गुन्हेगाराला ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडण्यात आले आहे, त्याने तिथून दररोज आपला फोटो आणि करंट लोकेशन पोलिसांना पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम आहे. नागरिकांच्या सूचना, तक्रारी तसेच वेगवेगळ्या विषयांवरील मते सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस घेणार आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांचा सोशली वावर अधिक सक्रिय करण्यासाठी सोशल मीडिया पेजेस नव्याने सुरू करण्यात आली आहेत.

ट्विटर –  www.twitter.com/pccity.police/
इन्स्टाग्राम – https://instagram.com/pccitypolice?igshid=1e6tbh5363xx2

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सध्या 15 पोलीस स्टेशन आहेत. शिरगाव, रावेत आणि म्हाळुंगे या तीन पोलीस ठाण्यांना नव्याने मंजुरी मिळाल्याने शहर पोलीस हद्दीत आता 18 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. त्या सर्व पोलीस स्टेशनला आयएसओ मानांकन मिळाले असून त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

एक्स ट्रॅकर अॅप्लिकेशन, सेवा उपक्रमाचे सादरीकरण सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी केले. स्मार्ट पोलिसिंगचे सादरीकरण उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले.

चिखली, तळेगाव एमआयडीसी, दिघी, आळंदी, निगडी पोलीस ठाण्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. महसेतुचे सीईओ ओंकार गौरीधर, सीईओ शशी भट, प्राचार्य किशोर रवंडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.  डॉ. अमरनाथ वाघमोडे यांना प्रातिनिधिक हेल्थ कार्ड देण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त आर आर पाटील बदली झाल्याबद्दल त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी आभार मानले.

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.