Chinchwad : ‘ते’ सध्या काय करतात ?

रजेवर आलेले पाच कैदी तुरुंगात परतलेच नाहीत; फरार कैद्यांना शोधणार 'विशेष पथक'

एमपीसी न्यूज – तुरुंगात शिक्षा भोगत असताना अभिवचन (फर्लो) आणि संचित (पॅरोल) रजेवर आलेले पिंपरी-चिंचवड शहरातील पाच कैदी तुरुंगात परतलेच नाहीत. दशके उलटली तरी त्यांचा पोलिसांना अद्याप सुगावा लागला नाही. त्यामुळे कारागृहालाच रजा दिलेले कैदी सध्या काय करतात? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या फरार कैद्यांच्या शोधासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक तयार करून फरार कैद्यांचा शोध घेण्याचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले आहेत.

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवनीत बाळकृष्ण नायडू, दीपक दत्तू थेऊरकर, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीपक रामचंद्र चावरिया, जितेंद्र तानाजी माने, आणि निगडीच्या हद्दीतील सुनील अनंत शिंदे हे पाच कैदी मागील दहा ते पंधरा वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देत आहेत. यातील नायडू हा अभिवचन रजेवर तर, इतर चौघे संचित रजेवर बाहेर आले होते. मात्र, ते पुन्हा कारावासात गेलेच नाहीत.

अप्पर पोलीस महासंचालक कार्यालय तसेच कारागृह प्रशासन यांच्याकडून राज्यातील बंदी फरारी कैद्यांच्या अटकेसाठी पाठपुरावा सुरु असतो. शहरामध्ये गुन्हे शाखा तसेच इतर गोपनीय विभाग गुन्हेगारांवर लक्ष ठेऊन असतात. मात्र, तरी देखील दशके उलटूनही हे कैदी पोलिसांच्या हाती लागत नाहीत. तरुंगातून बाहेर आल्यानंतर कैदी स्वतःचे नाव व पेहराव बदलून परराज्यात स्थायिक झाल्याचे बोलले जाते.

मागील दहा ते पंधरा वर्षांपासून फरार असलेल्या या कैद्यांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवा, तसेच त्यांचे फोटो पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागात लावा, असे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले. त्यानुसार सांगवी, निगडी आणि पिंपरी पोलिसांनी ‘त्या’ गुन्हेगारांचा युद्धपातळीवर शोध सुरु केला आहे. तसेच गुन्हे शाखेचे पोलीसही या कामाला लागले आहेत.

पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे पालन करत अप्पर पोलीस आयुक्तांनी फरार कैद्यांना शोधण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक नेमण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हे शाखा अथवा अन्य विभागाने या कैद्यांना पकडले, तर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कैदी सापडतील त्या ठाण्यातील कर्मचा-यांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी मरगळ झटकून कामाला लागले आहेत. सर्वच अधिकारी आणि कर्मचा-यांसमोर पहिला प्रश्न उपस्थित झाला आहे की, ‘ते सध्या काय करतात?’

कैद्यांना मिळतात अभिवचन आणि संचित रजा

गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आपल्या कुटुंबीयांमध्ये जाता यावे. तसेच त्याचे सामाजिक संबंध स्थापित राहावे यासाठी अभिवचन (फर्लो) आणि संचित (पॅरोल) अशा दोन प्रकारच्या रजा मिळतात. अभिवचन रजा हा प्रत्येक कैद्याचा अधिकार असतो. त्यासाठी त्याला तुरुंग प्रशासनासमोर कोणतेही कारण सादर करावे लागत नाही. अभिवचन रजा ही शिक्षेतली सूट समजली जाते.

संचित रजेसाठी कैद्याला तरुंग प्रशासनाला सबळ कारण द्यावे लागते. जवळचे नातेवाईक आजारी असतील, घरात एखादा महत्वाचा कार्यक्रम असेल अशा महत्वाच्या कामासाठी कैदी संचित रजेसाठी अर्ज करून शकतो. सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा काही कालावधी पूर्ण केल्यावर तसेच कैद्यांचे वर्तन आणि स्थानिक पोलिसांचा अहवाल मागवून या अर्जावर विचार करून रजा दिली जाते. 15 दिवसांपर्यंत तुरुंग प्रशासनाला संचित रजा देण्याचा अधिकार आहे. त्यापेक्षा जास्त म्हणजे 30 दिवसांपर्यंतची रजा विभागीय आयुक्त देऊ शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.