Pimpri – Chinchwad RTO : आरटीओच्या वायुवेग पथकाकडून सव्वासात हजार जणांवर कारवाई; 11 हजार जणांचे समुपदेशन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (Pimpri – Chinchwad RTO) वतीने पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यामध्ये मागील चार महिन्यात आरटीओ च्या एका पथकाने हजारो वाहनांवर कारवाई केली आहे. आरटीओच्या वायुवेग पथकाकडून डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांच्या कालावधीत सात हजार 310 वाहन चालकांवर विविध प्रकारची कारवाई करण्यात आली. तर 11 हजार 70 वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आले.

द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रस्त्यांची अवस्था सुधारणे, रस्त्यावरील वाहनांचे वेग कमी करणे, जागोजागी मदतकेंद्र उभारणे यासह नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करणे, अशा उपाययोजनांचा त्यात समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाच्या वायुवेग पथकाने द्रुतगती मार्गावर तब्बल सात हजार 310 वाहन चालकांवर कारवाई केली. त्यात मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे, लेन कटिंग आणि सीटबेल्ट न वापरणे याबाबत सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे.

ओव्हरस्पीड प्रकरणी सर्वाधिक दोन हजार 682 जणांवर कारवाई झाली आहे. तर वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलल्या प्रकरणी चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. चार महिन्यांच्या कालावधीत वायुवेग पथकाने 17 हजार 156 वाहनांची तपासणी केली. प्रवासी बसमध्ये सामानाची वाहतूक करत असल्याचे देखील या तपासणीत आढळून आले. याबाबत 38 बसेसवर कारवाई झाली आहे.

वायुवेग पथकाने चार महिन्यात 11 हजार 70 वाहन चालकांचे (Pimpri – Chinchwad RTO) समुपदेशन केले. वाहन चालकांना वाहतुकीचे नियम पाळावेत. रस्त्यावरील शिस्त याबाबत आरटीओ कडून वाहन चालकांना माहिती देण्यात आली.

वेगाने वाहने चालवू नयेत. सीटबेल्टचा वापर करावा. लेन कटिंगचे नियम पाळावेत. वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालवावी. – अतुल आदे (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड)

आरटीओकडून करण्यात आलेली कारवाई –

ओव्हरस्पीड – 2682
लेन कटिंग – 1556
सीटबेल्ट – 2128
रॉंग साईड पार्किंग – 347
मोबाईल वापरणे – 4
विदाउट फिटनेस – 39
विदाउट एमडीएल – 16
विदाउट इन्शुरन्स – 55
रॉंग डिस्प्ले – 80
विदाउट परमिट – 10
बसमध्ये सामानाची वाहतूक – 38

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.