Pimpri-Chinchwad RTO : लायसन्स अपॉइंटमेंटच्या कोट्यात वाढ

एमपीसी न्यूज – ऑनलाइन अपॉइंटमेंटच्या कोट्यात 30 जुलैपासून वाढ करण्यात आली असून यासाठी 29 जुलै पासून अपॉइंटमेंट घेता येणार आहे. शिकाउ अनुज्ञप्ती (कच्चे / लर्निंग लायसन्स) करिता दुपारी 4 वाजता तर पक्की अनुज्ञप्ती (पक्के लायसन्स) करिता दुपारी 5 वाजता ऑनलाईन अपॉईटमेंट घेता येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली आहे.

कोरोना संकटकाळातही सर्वच परिवहन कार्यालयातील कामे सुरू आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑनलाइन कामकाजावर जास्तीत जास्त भर दिला आहे. उपप्रादेशिक विभागाकडून दिल्या जाणाऱ्या लायसन्सच्या ऑनलाइन कोट्यात देखील वाढ करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालया अंतर्गत असणा-या शिबिर कार्यालयामधील कामे वगळता उर्वरीत सर्व कामे, शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करणे तसेच पक्की अनुज्ञप्ती चाचणी यांसारखी कामे सुरक्षितरीत्या सुरू आहेत.

पूर्वी शिकाउ अनुज्ञप्तीचा कोटा 42 होता. यात वाढ करून 30 जुलै पासून हा कोटा 63 एवढा होणार आहे. तसेच पक्क्या अनुज्ञप्तीसाठी पूर्वी 70 एवढा कोटा होता. त्यातही वाढ करून हा कोटा 30 जुलै पासून 115 एवढा करण्यात आला आहे.

29 जुलै पासून नागरिकांनी योग्य स्लॉट बुक करून ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी. त्यानंतर मिळालेल्या वेळेत चाचणीसाठी हजार राहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1