Pimpri-Chinchwad RTO : दसऱ्याच्या मुहूर्तावर 107 वाहनांची नोंदणी; शासनाच्या तिजोरीत एक कोटीचा महसूल जमा

एमपीसी न्यूज – दस-याच्या ( विजया दशमी ) मुहूर्तावर नवीन वस्तूंच्या खरेदीवर भर दिला जातो. त्यात वाहन खरेदी आणि दागिन्यांची खरेदी जोमात केली जाते. यावर्षी कोरोनाच्या सावटात देखील अनेकांनी आपले वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण केले आहे. दस-या दिवशी (रविवारी, दि. 25) पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) 107 वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यातून शासनाला एक कोटी 42 हजार 275 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

दसरा हा दिवस वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे दस-याच्या मुहूर्तावर नवीन काहीतरी करण्याचा, नवीन वस्तू खरेदीचा अनेकांचा अट्टाहास असतो. वाहनाला देखील लक्ष्मी मानले जाते. वाहनांच्या रूपाने लक्ष्मी घरी आणण्यास अनेकजण पसंती देतात. त्यामुळे दस-या दिवशी वाहनांच्या शोरूममध्ये एकच गर्दी पाहायला मिळते.

यावर्षी कोरोनाचे सावट असताना देखील अनेकांनी वाहन खरेदीला पसंती दिली आहे. दस-याच्या दिवशी पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात 97 दुचाकी, एक चारचाकी आणि 9 अन्य वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यातून शासनाच्या तिजोरीत एक कोटी 42 लाख 275 रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

शंभरहून अधिक लोकांनी जरी दस-याच्या दिवशी वाहन खरेदी केली असली तरी ही संख्या अन्य दिवसांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.

दस-याच्या 19 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या आठवड्यात तब्बल 3 हजार 630 वाहनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये 1 हजार 923 दुचाकी, 1 हजार 460 चारचाकी, 247 अन्य वाहनांचा समावेश आहे. या आठवड्यात 24 कोटी 13 लाख 49 हजार 128 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

मागील आठवड्यात 21 आणि 23 ऑक्टोबर रोजी सर्वाधिक वाहन विक्री झाली आहे. 21 ऑक्टोबर रोजी 525 दुचाकी, 235 चारचाकी तर 41 अन्य अशा 550 वाहनांची विक्री झाली.

तर 23 ऑक्टोबर रोजी 472 दुचाकी, 375 चारचाकी आणि 74 अन्य अशा एकूण 921 वाहनांची विक्री झाली आहे. या दोन दिवसात 8 कोटी 47 लाख 43 हजार 594 रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.