Pimpri-Chinchwad RTO : वाहन परवाना मिळण्याचे कामकाज 22 जूनपासून होणार सुरु

Vehicle licensing will start from June 22

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स), पक्की अनुज्ञप्ती (परमनंट लायसन्स) चाचणीचे कामकाज येत्या सोमवार (दि. 22 जून) पासून सुरु होणार आहे. नागरिकांनी स्लॉट बुकिंग करून कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मागील काही दिवसांपासून शिकाऊ आणि पक्के लायसन्स देण्याचे कामकाज बंद ठेवले होते. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, परवाना विषयक सर्व कामे, वायुवेग पथक यांचे काम पुन्हा सुरु झाले आहे.

लायसन्स आणि वाहन विषयक कामांसाठी आगाऊ वेळ निर्धारण प्रणाली (अपॉईंटमेंट) सुरु करण्यात आली आहे. आरटीओ कार्यालयातील उपलब्ध कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संख्येनुसार कामकाज सुरु करण्यात आले आहे.

लर्निंग लायसन्सची संगणक चाचणी घेताना दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फूट अंतर राखले जाणार आहे. एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक, की बोर्ड सॅनिटाईज केले जातील, अशी काळजी घेतली जाणार आहे.

तसेच अर्जदारांनी आरटीओ कार्यालयात येताना मास्क, हॅन्डग्लोज घालून प्रवेश करावा, असे आवाहन आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वैधता संपलेल्या लर्निंग लायसन्सची वैधता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.

त्यामुळे लर्निंग लायसन्स धारकांनी आपल्या वेळेत पक्के लायसन्स चाचणी देऊन घ्यावे, असेही सांगण्यात आले आहे.

मोटार ड्रायविंग स्कूलच्या वाहनावर चाचणी घेतल्यास एका उमेदवाराची चाचणी झाल्यानंतर वाहन सॅनिटाईज केले जाईल. त्यानंतर दुस-या उमेदवाराची चाचणी घेतली जाईल.

ज्या अर्जदारांनी सहाय्यक मोटार वाहन पदाच्या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, त्या अर्जदारांनी शिकाऊ आणि पक्क्या लायसन्सची कामे प्राधान्याने करावी.

गरज भासल्यास व्हीआयपी कोट्याच्या (पीकप कँडिडेट) वापर करावा. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी आलेल्या वाहनांचे सॅनिटायझजेशन झाल्यानंतरच त्या वाहनांची चाचणी घेतली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.