Pimpri Ganesh Festival News : पिंपरी चिंचवड श्री गणेश फेस्टिवल रविवारपासून ऑनलाईन

सार्वजनिक गणेश उत्सवावर बंधने असल्यामुळे दरवर्षी होणारे देखावे, मनोरंजन कार्यक्रम सादर होणार नाहीत.

एमपीसी न्यूज – उद्यापासून सर्वांचे लाडके बाप्पा घरोघरी विराजमान होत आहेत. यावर्षी कोरोना पार्श्ववभूमीवर गणेश उत्सव साजरा करण्यावर काही प्रमाणात मर्यादा आल्या आहेत. सार्वजनिक गणेश उत्सवावर बंधने असल्यामुळे दरवर्षी होणारे देखावे, मनोरंजन कार्यक्रम सादर होणार नाहीत. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना घरबसल्या मनोरंजन उपलब्ध व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड श्री गणेश फेस्टिवल ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.

मंडप, साउंड, लाईट, एलईडी वॉल ओनर वेलफेअर असोसिएशनच्या वतीने हा ऑनलाईन फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यापासून करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे नागरिकांना मनोरंजन उपलब्ध होत नाही. अशावेळी स्थानिक कलाकारांना घेऊन श्री गणेश फेस्टिवल ऑनलाईन करण्याची संकल्पना मांडण्यात आली.

त्यानुसार शहरातील हौशी तसेच व्यावसायिक कलाकारांनी उत्स्फुर्त सहभाग घेत या फेस्टिव्हलमध्ये विविध कला सादर केल्या जाणार आहेत.

अशा या विविध कलांचे ऑनलाईन प्रक्षेपण रविवारी (दि.23) पासून रोज रात्री आठ वाजता ‘एमपीसी न्यूज’ आणि ‘वेलफेअर असोसिएशन’च्या मार्फत केले जाणार आहे.

या फेस्टिवल मार्फत नागरिकांना सुगम संगीत, विविध गाणी, डान्स, पारंपरिक कला, भक्ती संगीत, भजन, विविध मान्यवरांच्या मुलाखती, कवी संम्मेलन, प्रवचन आणि अथर्व शीर्ष पठण यासारख्या कार्यक्रमाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. 23 ऑगस्टपासून रोज रात्री आठ वाजता एक तासाचा भाग दाखवला जाणार आहे.

या फेस्टिवलसाठी लागणारे सर्व तांत्रिक तसेच इतर सहकार्य वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मोफत करण्यात आले. तसेच, कलाकारांनी सुद्धा यासाठी कोणतेही मानधन घेतलेले नाही.

या ठिकाणी कला सादर केलेल्या कलाकारांनी लॉकडाउन नंतर प्रथमच रंगमंचावर सादरीकरण करून समाधानाची भावना व्यक्त केली आहे.

पिंपरी चिंचवड श्री गणेश फेस्टिवल मार्फत स्थानिक कलाकारांची कला नागरिकांना अनुभवता येणार आहे. गणेशोत्सवाचा आनंद द्वैगुणित करण्यासाठी विविध कलांची मेजवानी पिंपरी चिंचवड श्री गणेश फेस्टिवल मार्फत नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कार्यक्रमाची लिंक दररोज अद्ययावत केली जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.