Pimpri: स्मार्ट सिटीत अनागोंदी; हर्डीकर-पोमण जोडगळीचा ‘ओव्हर स्मार्ट’ कारभार

तीन वर्ष उलटूनही स्मार्ट सिटी कागदावरच/ स्मार्ट सिटीत स्मार्ट भ्रष्टाचार - भाग एक

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अनागोंदी असून गडबड घोटाळे होत आहेत. मोठ्या रकमेच्या निविदा काढणे, बाजारभावापेक्षा वाढीव दराने खरेदी केली जात आहे. स्मार्ट सिटीत समावेश होऊन तीन वर्षे उलटली तरी प्रकल्पातील एकही काम दृश्य स्वरुपात उभे राहू शकले नाही. ई-स्कूटर, सायकल शेअरिंगचा बोजवारा उडाला आहे. स्मार्ट सिटीला माहिती अधिकारी नेमलेला नाही. माहिती दडविली जाते. स्मार्ट सिटीला अध्यक्ष आणि स्वतंत्र सीईओ नसल्याने आयुक्त असलेले सीईओ श्रावण हर्डीकर, नीळकंठ पोमण यांचा ‘ओव्हर स्मार्ट’ कारभार सुरु आहे. विरोधक, स्मार्ट सिटी सल्लागार समितीचे सदस्य आक्षेप घेत असतानाही हर्डीकर-पोमण जोडगळीचा ‘बेधुंद’ कारभार सुसाट सुरु आहे.

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प हाती घेतला आहे. देशातील 100 शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील दहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात पिंपरी-चिंचवड शहराची 30 डिसेंबर 2016 रोजी निवड झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी या प्रकल्पाअंतर्गत क्षेत्रीय पायाभुत सुविधा (एरिया बेस डेव्हलपमेंट) या तत्वावर विकास करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत 1150 कोटींपेक्षा जास्त कामे होणार आहेत.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीमध्ये प्रचंड अनागोंदी सुरु आहे. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. तीनवर्षात केवळ कोट्यवधींच्या निविदा काढण्यावर स्मार्ट सिटीचा भर दिसून येतो. काम मात्र कागदावरच आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात सर्वत्र खोदाई केली आहे. या खोदाईमुळे एका महिलेला नाहक जीव गमवावा लागला आहे. शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत करोडो रूपयांची कामे केली जात असताना कंपनीकरिता माहिती अधिकारी नेमण्यात आलेला नाही. या कंपनीद्वारे राबविण्यात येणा-या प्रकल्पांची माहिती लपविली जाते. माहिती लपवून कोणाचे आर्थिक हितसंबंध जपाले जात आहेत, असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.

स्मार्ट सिटीतील अनागोंदीला सीईओ श्रावण हर्डीकर हेच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. महापालिका इतिहासात पहिल्यांदाच हर्डीकर यांच्यावर एवढे आरोप झाले आहेत. चिखलफेकीमुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. बारावीनंतरच्या शिक्षणाचा थांगप्तता नसलेल्या नीळकंठ पोमण यांना स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केल्याने आयुक्तांचे हसू झाले आहे. स्मार्ट सिटीचे कार्यालय चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर येथे नेले आहे. कार्यालयासाठी प्रतिमहिना चार लाख 40 हजार 635 रुपये भाडे मोजले जात आहे. एवढे भाडे मोजले जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
(क्रमशः)  

याबाबत ‘सीईओ’ श्रावण हर्डीकर म्हणाले, ”स्मार्ट सिटीमध्ये कोणत्याही प्रकारची खरेदी वाढीव दराने केली नाही. योग्य पद्धतीने निविदा प्रक्रिया अवलंबून खरेदी केली जात आहे. वेळोवेळी योग्य त्या सभेची मान्यता घेऊन, निविदा प्रक्रिया राबवूनच कार्यवाही केली जाते. स्मार्ट सिटीत कोणतीही अनियमितता झालेली नाही”. तर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीळकंठ पोमण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.