Pimpri: …तर शहरातील रुग्णसंख्या जुलैअखेरपर्यंत 24 हजार होईल- आयुक्त श्रावण हर्डीकर

Pimpri-Chinchwad: the number of Corona patients in the city will be 24 thousand by the end of July says pcmc Commissioner Shravan Hardikar पुढील दोन दिवसांत दिवसाला तीन हजार चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्त रुग्ण सापडतील. रुग्ण सापडणे चांगले आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी सध्या 12 दिवस लागत आहेत. हे प्रमाण लांबविण्याचे उदिष्ट आहे. पण, या गतीने रुग्णवाढ होत राहिल्यास जुलैअखेरपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 24 हजार होईल, असा अंदाज महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना वर्तविला आहे. त्यामध्ये 10 हजार सक्रिय रुग्ण असतील. बरे होणा-या रुग्णांची संख्या जास्त असेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, केवळ 15 दिवसांत नवीन 16 हजार रुग्ण वाढण्याचा अंदाज आयुक्तांनी वर्तविल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शहरातील रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढ होत आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जूनखेरपर्यंत शहरातील रुग्ण संख्या तीन हजार होईल असा वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे.

त्यानंतर जुलैच्या मध्यात 8 हजार रुग्ण होतील हा त्यांचा अंदाजही खरा ठरला आहे. आता जुलैच्या अखेरपर्यंत 24 हजार रुग्ण होण्याचा अंदाज आयुक्तांनी वर्तविला आहे. केवळ 15 दिवसांत 16 हजार नवीन रुग्णांची वाढ होण्याच्या अंदाज वर्तविण्यात आल्याने शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

याबाबत ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी सध्या 12 दिवस लागत आहेत. काही दिवसांपूर्वी डबलिंग रेट 10 दिवसांचा होता. आता त्यामध्ये वाढ होऊन तो 12 दिवसांचा झाला आहे. हा रेट लांबविण्याचे उदिष्ट आहे.

तर, दुसरीकडे चाचण्या देखील वाढविल्या आहेत. एका दिवसाला 1400 पर्यंत चाचण्या केल्या जात आहेत. रुग्ण वाढ तर होत आहेच. पण, चाचण्यादेखील वाढविल्या जात आहेत. त्यामुळे जास्त रुग्णांची वाढ होताना दिसून येत आहे.

जुलैअखेरपर्यंत 10 ते 12 हजार रुग्ण होतील असा आधी अंदाज होता. पण, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून झपाट्याने रुग्णवाढ होत आहे. या गतीने रुग्णवाढ होत राहिल्यास जुलैअखेरपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 24 हजार होईल. त्यात 10 हजार सक्रिय रुग्ण असतील. बरे होणा-या रुग्णांची संख्या जास्त असेल असे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढविण्यात येणार आहे.

पुढील दोन दिवसांत दिवसाला तीन हजार चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्त रुग्ण सापडतील. रुग्ण सापडणे चांगले आहे. कारण, त्यांच्याकडून प्रसार होणार नाही. त्यादृष्टीने काम चालू आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लक्षणे असलेल्या रुग्णांना लवकर शोधायचे आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून फार धोका नसतो. तरी पण ते सुद्धा थोडाफार प्रसार करु शकतात.

शहरातील वाढत्या रुग्णसंख्येचा अंदाज घेऊन तयारी केली जात आहे. कोविड केअर सेंटरच्या संख्येत वाढ करत आहोत. चिखलीतील सीसीसी सेंटर कार्यान्वित होत आहे. इंद्रायणीनगर आदिवासी मुलांचे वसतीगृह, किवळेतील सिम्बॉयोसिस कॉलेज, ताथवडेतील इंदिरा कॉलेजमध्ये सीसीसी सेंटरचे काम करत आहोत.

शाळांच्या इमारती देखील घेत आहोत. त्यामध्ये देखील सीसीसी सेंटर केले जाणार आहे. दहा हजार रुग्णांसाठी सेंटर तयार करत आहोत.

घरी शक्य नसलेल्या रुग्णांवर सीसीसी सेंटरमध्ये उपचार केले जात आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांनी घरीच आयसोलेट व्हावे. घरी सर्वांत सुरक्षित राहता येते. पाहिजे तसे पोषक जेवण मिळते. तब्येत खराब होत आहे, त्रास होत असल्यास पालिकेला कळवावे.

पालिकेने 020-67331140, 020-67331143 हा कॉल सेंटर नंबर सुरु केला आहे. दिवसातून दोनवेळा होम आयसोलेट असलेल्या रुग्णांना फोन करुन विचारपसून केली जात आहे. शहरातील रुग्णालयातील बेडची माहिती देखील पालिकेच्या संकेतस्थळावर दिली जाणार असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

शहरातील मृत्यूचे प्रमाण केवळ दीड ते पावणे दोन टक्के

पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पण, शहरातील मृत्यूदर कमी ठेवण्यात यश येत आहे. शहरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण केवळ दीड ते पावणे दोन टक्के आहे.

राज्यातील कोविड समर्पित रुग्णालयांपैकी सर्वांत कमी मृत्यूदर वायसीएमचा आहे. हे प्रमाण देखील कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. शहरातील रुग्णांचा पुण्यातील रुग्णालयात मृत्यू झाल्यावर त्याची माहिती उशिरा मिळते. त्यामुळे त्याची नोंद करायला विलंब लागतो. त्यामुळे एखाद्या दिवशी मृत्यूसंख्येत वाढ दिसून येत आहे, असेही आयुक्त हर्डीकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.