Pimpri Chinchwad Water Supply : वाढीव पाण्यासाठी आता 20 ऑगस्टची तारीख; 95 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची वाढती (Pimpri Chinchwad Water Supply) लोकसंख्या आणि पाण्याचे अपुरे प्रमाण यामुळे शहरातील विविध भागात पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे महापालिकेने आंद्रा धरणातून 100 एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून 200 एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्यात आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी आणण्यात येणार आहे. 20 ऑगस्टपर्यंत 100 एमएलडी पाणी शहराला मिळेल. 95 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

औद्योगिकनगरीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या पुढे गेली आहे. वाढते नागरीकरण, पाण्याची गळती रोखण्यात प्रशासनाला आलेले अपयश, अनधिकृत नळजोडधारकांची असलेली मोठी संख्या यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहरवासियांना 2019 पासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. शहराला मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे.

Nigdi : पोटाला चाकू लावून व्यावसायिकाला 15 लाखांची मागणी

पवना धरणातून महापालिका 510 एमएलडी पाणी उचलते. मात्र, शहराची वाढती मागणी लक्षात घेता महापालिका प्रशासनाने आंद्रा धरणातून 100 एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून 200 एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी आणण्यात येणार आहे. हे पाणी आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीत सोडले जाणार आहे. निघोजे येथील बंधाऱ्यांवरून महापालिका चिखली येथील नव्याने बांधण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणणार आहे. त्याठिकाणी पाणी शुद्ध केल्यानंतर चिखली, भोसरी, मोशी, चऱ्होली आदी भागात या पाण्याचे वितरण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मात्र, आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे हे काम सुमारे दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. तरीही अद्याप काम पूर्ण झाले नसून सध्यस्थितीत 95 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पाणी पुरवठा विभागातील (Pimpri Chinchwad Water Supply) अधिकारी करत आहेत.

दरम्यान, 15 जुलैपर्यंत शहराला वाढीव 100 एमएलडी पाणी मिळणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी यापूर्वीच सांगितले होते. मात्र, हा मुहूर्त टळला. आता पाणी पुरवठा विभागाच्या वतीने नव्याने 20 ऑगस्टचा मुहूर्त दिला आहे. या मुदतीत तरी काम पूर्ण होऊन शहरवासीयांना वाढीव पाणी मिळेल का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

याबाबत कार्यकारी अभियंता देवान्ना गट्टूवार म्हणाले, ”आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. विद्युतविषयक कामकाज बाकी आहे. पावसाळ्यामुळे खोदाईचे काम करण्यास अडचण निर्माण होत आहे. मात्र, 20 ऑगस्टपर्यंत सर्व काम पूर्ण होऊन वाढीव पाणी शहरवासीयांना मिळेल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.