Pimpri: ‘लॉकडाऊन’मध्ये नेते आहेत कुठे, करतायत काय?’

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात असलेले शहरातील राजकीय नेते देखील घरी बसून आहेत. फोनवरुन कामाचा आढावा, पुस्तक वाचन, टीव्ही बघणे, गाण्यांची मैफलीत नेते रंगले आहेत. तसेच सध्या आम्ही पण लॉकडाऊन आहोत, तुम्ही पण राहा, असे आवाहनही या लोकप्रतिनिधींनी केले आहे.

राजकीय नेते म्हटले की कार्यकर्त्यांचा गराडा आलाच. नेत्यांनाही लोकांमध्ये राहण्याची सवय असते. परंतु, लॉकडाऊनमुळे पहिल्यादांच नेत्यांवर देखील घरी राहण्याची वेळ आली आहे. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असून नऊ दिवस पूर्ण झाले आहेत.

मोबाईलवरुनच शहराचा कारभार – महापौर

महापालिकेत जावे  लागते, पण लगेच परत येते. ‘सोशल डिस्टन्सिंग’मुळे फोनवरुनच शहराचा कारभार हाकत आहे. अडचणी, चौकशी, अधिका-यांना सूचना फोनवरुनच देत आहे. गोरगरीब नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करणे, सर्वांपर्यंत मदत पोहचते की नाही याची माहिती घेते. त्यामधून थोडा वेळ काढून घरी पुस्तके वाचते. घरी असल्याने घरी स्वयंपाक देखील करते, असे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी केली खासदार बारणे यांची विचारपूस!

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, 30 वर्षामध्ये पहिल्यांदाच इतके दिवस घरी राहत आहे. पहिल्यापासून घरी बसण्याची सवयच नाही. सकाळी कार्यकर्त्यांकडून आढावा घेतो. गोरगरीबांना मदत करण्याच्या सूचना करतो. मतदारसंघात पुणे आणि रायगड असे दोन जिल्हे येत असल्याने दोनही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी बोलतो.  डॉक्टर, अधिकाऱ्यांकडून दररोज आढावा घेतो. त्यानंतर दिवसभर वाचन करतो. सध्या जवळ अनेक पुस्तके असून चांगले वाचन होत आहे. सायंकाळी पुन्हा आढावा घेऊन सूचना करतो. नागरिक खूप अडचणीत असून त्यांना मदत करण्याच्या सूचना करत आहे. कार्यकर्त्यांशी फोनवरुन संपर्क साधतो. दोन दिवसांपूर्वी पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून तुम्ही घराबाहेर पडू नका, स्वत:ची, परिवाराची काळजी घ्या. बाहेर पडू नका, फोनवरुनच कामे करा, अशी सूचना त्यांनी केली आहे.

राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच एवढे दिवस घरी – आमदार जगताप

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप – ”आजपर्यंत पहिल्यांदाच एवढे दिवस घरी राहिलो आहे. पुस्तके वाचतो. टीव्ही पाहतो. दुपारी आराम करतो. मतदारसंघातील  दररोज दोन हजार नागरिकांना जेवण पुरविले जाते. त्याचे नियोजन करतो. कोणाला मदत कमी पडत असेल तिथे मदत पोहचविली जाते. कार्यकर्ते भेटायला आले तरी पाच फुटांचे अंतर ठेवले जाते. ‘सोशल डिस्टन्सिंग’चे कटाक्षाने पालन केले जाते”.

आमदार महेशदादा खेळतात चल्लसआठ!

गाणी ऐकतो. लहानपणीचे चल्लसआठ खेळ, कॅरम खेळतो. गाणी म्हणतो, बच्चे कंपनीसोबत गाण्यांच्या भेंड्याची मैफल रंगते. आम्हाला कधीच घरी थांबायला मिळत नाही, परंतु आता लॉकडाऊनमुळे घरी राहिलो आहोत. या निमित्ताने घरच्यांसोबत जास्त वेळ भेटला आहे, असे भाजप शहराध्यक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.  तसेच दिवसभरात दोनदा कार्यकर्त्यांकडून मदतीचा आढावा घेतो. प्रशासनाकडून माहिती घेतो. आवश्यकता आहे तिथे जातो. जेवणाची सोय केली आहे. भाजीपाला विक्रेते, मंडईतील लोकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करतो, असेही ते म्हणाले.

आमदार बनसोडे रमले पुस्तक वाचनात

पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, ”कार्यकर्त्यांचा गराडा कमी झाला आहे. फोनवरुनच नागरिकांना मदत करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना करतो. धान्य, जेवण वाटपाचा आढावा, प्रशासनाकडून माहिती घेणे, पुस्तके वाचतो असा दिनक्रम सुरु आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.