Pimpri: पिंपरी-चिंचवडचे कारसेवक

pimpri-chinchwad's karsevak पिंपरी-चिंचवड शहरातून 1992 च्या वेळी अनेक कारसेवक अयोध्येला कारसेवेसाठी गेले होते. तिथे भजन, कीर्तन, रामनाम जप, प्रबोधन अशी अनेक धार्मिक कामे हे कारसेवक करत होते.

एमपीसी न्यूज – अयोध्या येथील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या राम मंदिराचे भूमी पूजन 5 ऑगस्ट 2020 रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमी पूजनाचा समारंभ होणार आहे. भूमी पूजनाच्या कार्यक्रमात सुमारे 200 व्यक्ती सहभागी होणार असून याचे थेट प्रसारण दूरदर्शनवरून केले जाणार आहे. यानिमित्ताने राम मंदिर प्रकरण आणि पिंपरी-चिंचवडमधील कारसेवक यांचा उहापोह….

राम मंदिर बनविण्याचे काम अहमदाबाद येथील कारागीर चंद्रकांत सोमपुरा यांना देण्यात आले आहे. चंद्रकांत यांचे वडील प्रभाशंकर सोमपुरा यांनी प्रभास पाटण येथील सोमनाथ मंदिर बनविले आहे. आता त्यांचा मुलगा चंद्रकांत अयोध्या येथील राम मंदिर बनविणार आहेत.

राम मंदिरासोबत परिसरात सीता, लक्ष्मण, गणेश आणि हनुमान यांचीही मंदिरे तयार केली जाणार आहेत. 161 फूट उंच होणा-या या मंदिरासाठी सहा लाख क्युबिक फूट दगड लागणार आहे. 366 खांब असलेले हे मंदिर पुढील चार वर्षात बांधून पूर्ण होईल, अशी खात्री चंद्रकांत सोमपुरा यांनी व्यक्त केली आहे.

राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा वाद सोळाव्या शतकापासून सुरु होता. 6 डिसेंबर 1992 ला विवादित ढांचा पाडण्यात आला होता. त्यानंतर याला हिंसक वळण लागले होते.

नुकताच या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून मूळ जागेवर राम मंदिर बनविण्यात येणार असून त्यासाठी सरकारी समिती स्थापन करून त्याद्वारे मंदिराची स्थापना आणि देखरेख करावी, असे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.

त्यानुसार 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. राम मंदिर-बाबरी बशीद या प्रश्न सुरु झाल्यापासून आजवर या प्रकरणाशी अनेक राजकीय मंडळी, पक्ष, देशातील महत्वाच्या व्यक्ती जोडल्या गेल्या आहेत.

भूमी पूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सबंध देशभरातील कारसेवक आणि राम भक्तांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे. तसेच राम मंदिराच्या आजवरच्या लढाईत अनेकांच्या अनेक आठवणी देखील आहेत.

राम मंदिर आणि पिंपरी-चिंचवड शहर यांचेही संबंध आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून 1992 च्या वेळी अनेक कारसेवक अयोध्येला कारसेवेसाठी गेले होते. तिथे भजन, कीर्तन, रामनाम जप, प्रबोधन अशी अनेक धार्मिक कामे हे कारसेवक करत होते.

1992च्या आसपास दोन टप्प्यांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातून सुमारे 350 कारसेवक अयोध्येला गेले होते. मात्र, दंगलीचे वातावरण असल्यामुळे पहिल्या टप्प्यात गेलेल्या कारसेवकांना झाशी रेल्वे स्थाकावरून परत हुसकावून देण्यात आले. त्यानंतर सर्व तयारी करून काही कारसेवक पुन्हा अयोध्येच्या मार्गावर रवाना झाले आणि मजल दरमजल करत अयोध्येत पोहोचले सुद्धा.

पिंपरी-चिंचवड शहरातील कारसेवक अयोध्येत पोहोचले त्यावेळी तिथले वातावरण फार काही चांगले म्हणावे, असे नव्हते. कारसेवकांवर गोळीबार झाला होता. शरयू नदीतून अनेकांची प्रेतं वाहून जात होती.

दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये कल्याण सिंग याचं सरकार आलं आणि कारसेवकांच्या राहण्या-खाण्याची योग्य सोय झाली. नंतरचे काही दिवस परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी गेले.

पिंपरी-चिंचवड शहरातून गेलेले कारसेवक सुमारे 19 दिवस अयोध्येत राहिले. प्रत्येक राज्यातून आलेल्या नागरिकांचे राज्यानुसार स्वतंत्र मंडप होते. त्यातून संघटनात्मक कारसेवा केली जात असे.

पिंपरी-चिंचवड शहरातून कट्टर हिंदुत्ववादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी, शिवसेवा आदींचे कार्यकर्ते अयोध्येला कारसेवेसाठी रवाना झाले होते. त्यातच एक कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जाणारे शहरातील माजी नगरसेवक वसंत तेलंगी हे देखील होते.

तेलंगे कारसेवेत अगदी अग्रेसर होते. त्यांच्या या कारसेवेची दखल शिवसेना पक्षाच्या अतिवरिष्ठ पदाधिका-यांनी घेतली. त्यांना महापालिका निवडणुकीत संधी दिली. सुरुवातीला दहा ते पंधरा मतांनी त्यांचा विजय निसटला, मात्र. दुस-या वेळी 2002च्या महापालिका निवडणुकीत मात्र ते नगरसेवक म्हणून निवडून देखील आले. त्यानंतर त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले आणि त्यातच त्यांची राजकीय कारकीर्द संपली.

पिंपरी-चिंचवड शहरातून दोन्ही वेळेला गेलेल्या कारसेवकांमध्ये भाजपचे पदाधिकारी महेश कुलकर्णी देखील होते. महेश कुलकर्णी याबाबत बोलताना म्हणतात, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने राम मंदिर बांधण्यासाठी एक समिती तयार करून त्याद्वारे मंदिराची उभारणी करायची आहे. त्यामुळे सरकारचे प्रमुख म्हणून मंदिराच्या भूमी पूजनाचा मान नरेंद्र मोदी यांना मिळत आहे. हा दुग्धशर्करा योग आहे.

कोरोनाच्या काळात कुणालाही कुठेही जाता येत नाही. त्यामुळे देशभरातील सर्व कारसेवक आपापल्या घरात अडकून पडले आहेत. भूमी पूजनाच्या मंगल प्रसंगी अयोध्येत जाता येत नाही, याची खंत वाटत असली तरी दुस-या बाजूला मंदिर उभारणीला सुरुवात होत आहे, याचा खूप आनंद देखील होत आहे, असेही कुलकर्णी म्हणतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.