Pimpri: महापौर उषा ढोरे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

Pimpri-Chinchwad's Mayor Usha Dhore's corona report is negative शहरवासियांनी अधिक काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये, काही कामानिमित्त बाहेर पडल्यास तोंडाला मास्क लावा. सुरक्षित अंतर पाळा.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रथम नागरिक महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली आहे. त्यांचे रिपोर्ट रविवारी (दि.5) रात्री उशिरा आले आहेत. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे महापौरांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. वाढलेला प्रसार तसेच काही सहकारी नगरसेवकांना झालेली कोरोनाची लागण यामुळे महापौर ढोरे यांनी स्वतःची कोरोना तपासणी करून घेतली. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून महापौर ढोरे या वयाच्या 60 व्या वर्षी सुद्धा अहोरात्र कार्यरत आहेत.

विविध रुग्णालयांशी चर्चा, विविध भागांतील कोरोनाग्रस्त आणि कंटेन्मेंट भागाची पाहणी करणे, उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेणे, रुग्णालयांना भेटी देणे, पिंपरी-चिंचवडसह पुण्यात विविध मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बैठकांमध्ये सामील होणे, स्वतः अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेत काही सूचना करण्याचे काम त्या करत आहेत.

त्यांची धावपळ होते. त्यामुळे खबरदारी म्हणून महापौर ढोरे यांनीही स्वतःची कोरोना तपासणी करून घेतली.

महापौर ढोरे म्हणाल्या, सध्या काळ वाईट आहे. मी काळजी घेऊनच रोजची दिनचर्या पार पाडत आहे. शहरवासियांनी अधिक काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये, काही कामानिमित्त बाहेर पडल्यास तोंडाला मास्क लावा. सुरक्षित अंतर पाळा. वारंवार हात धुवत राहा किंवा सॅनिटायजरने हात स्वच्छ करा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.