BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : सिगारेटच्या वादातून एकाचा चाकूने भोसकून खून; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सिगारेट आणण्यासाठी नकार दिल्यावरून चौघांनी मिळून एकाचा चाकुने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) रात्री साडेअकराच्या सुमारास विठ्ठलनगर झोपडपट्टी, नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

शाम किसन खंडागळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी करण रमेश धुरंधरे (वय 22, रा. विठ्ठलनगर, नेहरुनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आकाश खरात (वय 22), विजय सावंत (वय 20, दोघे रा. खंडेवस्ती, भोसरी) आणि त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी करण त्यांचा मयत मामा शाम, त्यांचे मित्र अभिजित प्रल्हाद शेळके, सूरज दिनेश जावळे हे चौघेजण विठ्ठलनगर झोपडपट्टीतील ससाणे चाळीतून जात होते. त्यावेळी एका अल्पवयीन मुलाने शाम यांना सिगारेट आणण्यास सांगितले. शाम यांनी त्याला समज देत सिगारेट आणण्यास नकार दिला. यामध्ये अल्पवयीन मुलगा आणि शाम यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यावेळी अल्पवयीन मुलगा त्याच्या दोन साथीदारांसोबत ससाणे चाळीकडे पळून गेला.

काही वेळाने सर्व आरोपी शाम यांच्याजवळ आले. त्यांनी शाम यांच्या पोटात चाकूने भोसकले. तसेच लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करत शाम यांचा खून केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.