Pimpri : कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जनास नागरिकांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri) येथील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन करता यावे, यासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आला होता. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, कोरोना काळापासून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमास सलग 4 वर्ष नागरिकांच्या वतीने भरघोस प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या वतीने विसर्जन घाट बंद करून संकलन केंद्र उभारण्यात आले होते.

त्यामुळे नागरिकांना तसेच सार्वजनिक गणेश मंडळांना धार्मिक पद्धतीने विधिवत गणेशमूर्तींचे विसर्जन वा संकलन करता यावे याकरिता जनसंपर्क कार्यालय जवळ विसर्जन हौदांची व मूर्ती संकलन केंद्राची व्यवस्था प्रभागातील तसेच परीसरातील नागरिकांसाठी करण्यात आली होती.

गणेशोत्सवाच्या पाचव्या, सातव्या, नवव्या व अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुमारे 5000 पेक्षा जास्त नागरिकांनी भक्तिमय वातावरणात गणेशमूर्ती विसर्जनाचा लाभ घेतला.

विसर्जन केंद्रामध्ये आलेल्या भाविकांना श्री गणरायाची आरती करण्यासाठी सुमारे 40 X 60 आकाराचा मोठा मंडप देखील टाकण्यात आला होता. गणेश मूर्ती विसर्जन हौद व संकलन केंद्र याची व्यवस्था दहाही दिवस सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरु होती.

PCMC : ढोल ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करत, वरुणराजाच्या साक्षीने गणरायाला निरोप; पालिकेचे यशस्वी नियोजन

तसेच विसर्जनासाठी आलेल्या भाविकांमार्फत (Pimpri) गोसवेसाठी स्वइच्छेने देण्यात आलेली रक्कम भोसरी येथील पुणे पांजरपोळ ट्रस्ट यांना सुपूर्त करण्यात आल्याची माहिती वाघेरे यांनी दिली. कृत्रिम तलावामध्ये जास्तीत जास्त मूर्ती विसर्जन करून प्रदूषण रोखण्यास मदत करावी आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा या आवाहनास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याने वाघेरे यांच्या वतीने नागरिकांचे आभार मानण्यात आले आहे. कार्यक्रमाचे नियोजन हरीश वाघेरे, सचिन वाघेरे, गणेश मंजाळ, विठ्ठल जाधव, रंजनाताई जाधव,सारथी काळे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.