Pimpri: स्वच्छतेबाबत प्रशासनाबरोबर नागरिकही उदासीन

प्रशासनाला ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यात अपयश

एमपीसी न्यूज – स्वच्छ भारत सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहर तिसऱ्यावेळी पुन्हा पिछाडीवर गेले आहे. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा न घेणे, हे त्यामागील मुख्य कारण आहे. तसेच कचर्‍याची विल्हेवाट आणि नागरिकांचा अल्प प्रतिसाद या गटात गुण कमी मिळाल्याने शहराची क्रमवारीत घसरण झाली आहे. स्वच्छतेबाबत तीन वर्ष महापालिका प्रशासानाने गांभीर्याने पाहिले नाही. ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती उद्‌भवली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर गेल्या वर्षीच्या 43 व्या क्रमांकावरून 52 व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. या सर्वेक्षणातून घरोघरी जमा होणारा ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जात नसल्याची स्थिती आहे. वेगवेगळा कचरा दिला तरी, पालिकेच्या कचराकुंड्या तसेच वाहनांमध्ये तशी सुविधा नसल्याने तो कचरा एकत्रित केला जातो. वारंवार नोटीसा देऊनही शहरातील 460 पैकी केवळ 50 मोठ्या हाउसिंग सोसायट्यांनी कंपोस्ट खत प्रकल्प सुरू केले आहेत.

  • त्याचबरोबर हॉटेल वेस्टबाबत पालिका उदासीन आहे. बायोगॅस प्रकल्प अद्यापही कार्यान्वित होऊ शकलेला नाही. महापालिकेचा ‘कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डिमोलेशन वेस्ट’ प्रकल्प नाही. त्यामुळे कचरामुक्त शहर (स्टार रेटींग) आणि ‘ओपीएफ’ प्रमाणिकरण गटात 1,250 पैकी केवळ 600 गुण मिळाले आहेत. या गटात पुरेसे गुण नसल्याने शहराला ‘थ्री स्टार रेटींग’ नाकारण्यात आले आहे.

महापालिकेच्या सेवास्तरावरील प्रगती गटात 1,250 पैकी केवळ 727.29 गुण मिळाले आहेत. नागरिकांच्या प्रतिक्रियासाठी (फिडबॅक) असलेल्या 1,250 पैकी केवळ 885.04 गुण मिळाले आहेत. केंद्र शासनाच्या 4 सदस्यांनी केलेल्या 5 दिवसांच्या प्रत्यक्ष पाहणीत 1,250 पैकी 1,016 गुण मिळाले आहेत. शहरातील भाजीमंडई, सार्वजनिक शौचालय व तेथील सुरक्षितता, स्वच्छतेबाबत संदेश, रेल्वे व बस स्थानक, झोपडपट्टी आदी ठिकाणी पथकाने अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. या पाहणीस सर्वाधिक गुण मिळाले आहेत.

  • शहराला मिळालेले गुण : (1,250 पैकी)
    1) महापालिका सेवास्तरावरील प्रगती -727.29
    2) कचरामुक्त शहर (स्टार रेटींग) व ओडीएफ प्रमाणिकरण -600
    3) प्रत्यक्ष निरीक्षण- 1,016
    4) नागरिकांच्या प्रतिक्रिया – 885.04

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.