Pimpri : अत्यावश्यक सेवेत असून सुद्धा सर्रास खासगी दवाखाने बंद; रुग्णांच्या गैरसोयीत वाढ

एमपीसी न्यूज – खासगी सेवा पुरवणारे दवाखाने आणि क्लिनिक यांनी असंवेदनशीलता न दाखवता आपले दवाखाने सुरू ठेवावेत, अशी आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सूचना देऊन सुद्धा शहरातील खासगी दवाखाने व क्लीनिक सर्रास बंद आहेत. कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे व काही रुग्ण आपली मेडिकल हिस्ट्री लपवून ठेवत असल्यामुळे खासगी दवाखाने बंद ठेवण्यात आल्याचे निदर्शनात येत आहे.

शहरातील खासगी दवाखाने व क्लिनिक बंद असल्याने सामान्य खोकला, ताप किंवा इतर आजारांवर उपचार करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. खासगी दवाखाने सुरू नसल्याने सरकारी दवाखान्यात तपासणीसाठी गर्दी होत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्याप्रमाणे खासगी दवाखाने हे अत्यावश्यक सेवेत असून खासगी दवाखान्याच्या डॉक्टरांनी असंवेदनशील न वागता त्यांचे दवाखाने सुरू ठेवावे. असे असताना देखील मोठ्या प्रमाणावर शहरातील खासगी दवाखाने व क्लिनिक बंद ठेवण्यात आली आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांमध्ये भीतीचे व काळजीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे किरकोळ ताप, खोकला व सर्दी असली तरी नागरिकांमध्ये काळजी निर्माण होत आहे. तसेच तपासणीसाठी खासगी दवाखाने उघडे नसल्याने चिंतेत आणखीच भर पडत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.