Pimpri – एका व्यासपीठावर या, तुम्ही बोलाल त्या भाषेत उत्तर देतो – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज-आजपर्यंत सात निवडणुका लढवल्या, आजवर कोणीही शिक्षण विचारले नाही. राष्ट्रवादी पक्षाला या निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मला मराठी उत्तम बोलता येतं, असे म्हणत ‘एका व्यासपीठावर या, तुम्ही बोलाल त्या भाषेत उत्तर देतो’, असे सडेतोड उत्तर महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर शिक्षणावरून आरोप केले होते.

आकुर्डी येथे भारतीय कामगार सेनेचा कामगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे बोलत होते. यावेळी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, सल्लागार मधुकर बाबर, शहर प्रमुख योगेश बाबर, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहर भिसे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद आदी उपस्थित होते.

  • खासदार बारणे म्हणाले, “ज्यांनी शहराला लुटलं, निरपराध शेतक-यांवर गोळीबार घडवून आणला, त्यांच्याशी माझी लढाई आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पत्तासुद्धा सापडत नाही, नंतर उमेदवार सापडणं तर दूरची गोष्ट आहे. उमेदवाराला उभं करायचं आणि वाऱ्यावर सोडायचं, ही सवय राष्ट्रवादी पक्षाची आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला लिहून दिलेलं भाषण देखील वाचून दाखवता येत नाही. लिहिलेलं मराठी वाचण्यासाठी अडखळले जातात.

अझमभाई पानसरे यांनी 2009 साली लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या कोणत्याही नेत्याने मतदारसंघातील कोणत्याही कार्यकर्त्यांना फोन केले नाहीत. आता घरातील उमेदवार निवडणूक लढवत असल्याने अजित पवार मावळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांना फोन करीत आहेत. केवळ घरचा उमेदवार असल्याने पवार घराण्याची ही धावपळ सुरू आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.