Pimpri : पार्थ पवारांवर टीका; दिवा विझताना जसा फडफडतो तशी बारणेंची फडफड – दत्ता साने 

एमपीसी न्यूज – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्याकडे आम्ही युवा नेतृत्व म्हणून पाहतो. ते मावळ मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित नाही. कार्यकर्ते त्यांचे फलक लावत आहेत. पार्थ यांची फलकावर छबी झळकताच शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांची धास्ती घेतली आहे. प्रत्यक्षात पार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास बारणे मावळच काय कर ‘गुगल’वर शोधले तरी सापडणार नाहीत, असे प्रत्युत्तर महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिले आहे. तसेच बारणे यांचा खासदारकीचा कार्यकाळ संपत आला असून दिवा विझतना जसा फडफडतो तशी बारणे यांची फडफड सुरु असल्याचाही हल्लाबोलही त्यांनी केला.

मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार हे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे मतदार संघात दौरे वाढले आहेत. शहरात त्यांचे स्वतंत्र फलक देखील झळकले होते. याबाबत पत्रकारांनी गुरुवारी (दि.9) खासदार श्रीरंग बारणे यांना विचारले असता त्यांनी कोण पार्थ पवार, आपण ओळखत नाही. कोणी फलकबाजी करून नेता होत नाही. पवार घराण्यातील कोणही उमेदवार असला तरी मावळचा पुढचा खासदार मीच असणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

त्याला आज शुक्रवारी (दि.11) विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अद्याप निश्चित झाले नाहीत. त्यामुळे पार्थ मावळातून उमेदवार असतील की नाही हे स्पष्ट नाही. कार्यकर्ते पार्थ यांचे फलक लावत आहेत. पार्थ यांची छबी फलकावर झळकताच बारणे यांनी पार्थ नावाची धास्ती घेतली आहे. प्रत्यक्षात पार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास बारणे मावळच काय कर ‘गुगल’वर शोधले तरी सापडणार नाहीत, असे साने म्हणाले.

पवार साहेबांमुळे श्रीरंग बारणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती झाले होते. बारणे यांच्या पुस्तकांमध्ये साहेबांचा फोटो असतो. त्या साहेबांचे पार्थ पवार नातू आहेत. साहेबांच्या नातूला बारणे ओळखत नसतील तर त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. बारणे यांचा खासदारकीचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे दिवा विझताना जसा फडफडतो तशी बारणे यांची फडफड सुरु आहे, असेही साने म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.