Pimpri: ‘कोरोना’च्या प्रश्नांना आयुक्तांची बगल; स्थायी समितीच्या बैठकीला प्राधान्य

एमपीसी न्यूज – जीवघेण्या कोरोना व्हायरसने पुणे शहरात शिरकाव केला असून पिंपरी-चिंचवडमध्ये पाच जण संशयित आढळले आहेत. असे असताना देखील आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोरोनाबाबतचे प्रश्न टाळले. पत्रकारांचे प्रश्न स्वीकारले जाणार नाहीत, असे सांगत स्थायी समितीच्या सभेला निघून गेले. त्यामुळे आयुक्त ‘कोरोना’ व्हायरसबाबत गंभीर आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोरोना व्हायरसबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने कोरोना व्हायरसबाबत केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यासाठी आज (बुधवारी) पत्रकार परिषद बोलविलेली होती.

यावेळी महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, अतिरिक्त आयुक्त, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी पत्रकार परिषदेला आले. परंतु, प्रशासनाचे प्रमुख आयुक्त श्रावण हर्डीकर पत्रकारपरिषदेला आले नव्हते. आपल्या कार्यालयात बसून होते. त्यानंतर आयुक्तांनी माहिती देण्याची मागणी करण्यात आली. बोलाविणे धाडल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर पत्रकार परिषदेला आले. केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

कोरोनाचे शहरात किती संशयित रुग्ण आहेत. त्यांची परिस्थिती काय आहे? असे प्रश्न पत्रकारांनी विचारले. परंतु, आयुक्त हर्डीकर यांनी प्रश्न स्वीकारले जाणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर एक प्रश्न स्वीकारला अन् आयुक्त उठून गेले. नवीन स्थायी समितीची आज पहिलीच सभा होती. आयुक्तांनी स्थायी समितीच्या बैठकीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. आयुक्तांनी कोरोनाचे प्रश्न टाळून स्थायी समिती सभेला जाणे पसंत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.