Pimpri : दोन सहाय्यक आयुक्तांवर , आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उगारला कारवाईचा बडगा 

बोदडे यांच्यावर दंडात्मक कारवाई तर इंदलकर यांना समज

एमपीसी न्यूज – कर्तव्यात कसूर करणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन सहाय्यक आयुक्त आणि सहाय्यक आरोग्य अधिका-यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्‍त आण्णा बोदडे आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे यांना प्रत्येकी दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांना सक्‍त ताकीद देण्यात आली आहे. दरम्यान, आयुक्तांनी गेल्या आठवड्याभरात सात अधिका-यांवर कारवाई केली आहे.

आण्णा बोदडे यांच्याकडे ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीयअधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार आहे. तर, बाबासाहेब कांबळे हे ‘क’ क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आरोग्य अधिकारीपदी कार्यरत आहेत. कार्यक्षेत्रातील साफसफाईची कामे करुन घेण्याची जबाबदारी या दोन्ही अधिका-यांची आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 23 ऑक्‍टोबरला अचानक ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारितील क्षेत्राची पाहणी केली.  पाहणीत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचून दुर्गंधी पसरल्याची बाब आढळली. अशा दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दोन्ही अधिका-यांनी साफसफाईविषयक कामकाजात गांभिर्याने लक्ष घालून जबाबदारीपूर्वक कामकाज करुन घेत नसल्याची बा निदर्शनास आली आहे.

त्यामुळे बोदडे आणि कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या दोन्ही अधिका-यांनी सादर केलेले खुलासे संयुक्‍तिक वाटत नसल्याने त्यांच्यावर प्रत्येकी 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या मासिक वेतनातून ही रक्कम कपात केल जाणार आहे.

महापालिका आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्‍त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. महापालिकेच्या अजंठानगर, मिलींदनगर प्रकल्पातील घरकुलांचे काम पूर्ण होऊनही त्यांचे अद्यापही वाट पूर्ण झालेले नाही. याशिवाय वेताळनगर पुनर्वसन प्रकल्पाबाबत मोठ्या संख्येने तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. यामुळे इंदलकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

लाभार्थ्यांचा सहभाग आणि प्रतिसाद असल्याशिवाय कामकाज पूर्ण होवू शकत नाही. लाभार्थ्यांनी अद्यापही स्वहिश्‍याची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे सदनिकावाटप प्रक्रिया राबविण्यास अडचण निर्माण होत असल्याचा खुलासा इंदलकर यांनी सादर केला; मात्र हा खुलासा आयुक्त हर्डीकर यांना संयुक्‍तिक वाटला नाही. हा खुलासा लक्षात घेता. इंदलकर यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 72 (क) चा भंग केल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळे त्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. या आदेशाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात केली जाणार आहे. भविष्यात त्यांच्याकडून कर्तव्य पालनात कसूर झाल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आठवडाभरात सात अधिका-यांवर कारवाईचा बडगा!

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कर्तव्यात कसूर करणा-या अधिका-यांवर धडक कारवाई सुरु केली आहे. गेल्या आठवडाभरात एकूण सात अधिका-यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये भ्रष्टाचाराला पूरक वातावरण निर्माण केल्याप्रकरणी क्रीडा विभागातील उपलेखापाल राजश्री देशपांडे यांची एक वेतनवाढ रोखली तर  क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे यांच्यावर पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. याच्याबरोबर विभागप्रमुखांच्या अनुपस्थितीत स्थायी सभेला गैरहजर राहणारे प्रशासन अधिकार राजीव जाधवर आणि राजेश जगताप यांना सक्‍त ताकीद देण्यात आली आहे. त्यात आज सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, बाबासाहेब कांबळे आणि चंद्रकांत इंदलकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.