Pimpri: लेटलतीफ अधिका-यांना आयुक्तांचा दणका; सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, उद्यान अधीकक्षकांना सक्त ताकीद

अर्ध्या दिवसाची रजा खर्ची टाकली; यापुढे कर्तव्यात कसूर केल्यास कडक कारवाईचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेटलतीफ अधिका-यांवर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित केलेल्या मिटिंगला उशिरा आलेल्या आठ अधिका-यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच त्यांची अर्ध्या दिवसाची किरकोळ रजा खर्ची टाकली आहे. त्यामध्ये दोन सहाय्यक आयुक्त, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, मुख्य उद्यान अधिक्षक, कार्यकारी अभियंता, मुख्य अग्निशामक अधिकारी, प्राचार्यांचा समावेश आहे.

सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे, मोरवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

  • महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सुसज्ज जीवनमान (Ease oF Living)बाबत 15 जून 2016 रोजी सकाळी 11 ते 1 यावेळेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग आयोजित केली होती. महत्वपुर्ण मिटिंग असल्याने सर्व संबंधित अधिका-यांना वेळेत उपस्थित राहण्याबाबत सूचना केल्या होत्या, असे असतानाही हे अधिकारी नियोजित मिटिंगला वेळेवर आले नाहीत. गैरहजर राहून त्यांनी कार्यालयीन शिस्तीचा भंग केला आहे. तसेच कामकाजाप्रती अनास्था दाखविल्याचे निदर्शनास आले आहे.

पूर्वकल्पना देऊनही मिटिंगला उशीर करणे, गैरहजर राहून कार्यालयीन शिस्तीचा भंग केला आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या लेटलतीफ अधिका-यांची 15 जूनची अर्ध्या दिवसाची किरकोळ रजा खर्ची टाकली आहे. यापुढे कार्यालयीन कर्तव्यात कसूर केल्यास नियमाधिन कारवाई करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.