Pimpri : पिंपरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याचे आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी भाजी मंडईचा विकास, पत्राशेड, लिंक रोड व अजंठानगर येथील रखडलेले पुनर्वसन, पिंपरी स्मशानभूमी ते सुभाषनगर डीपी रस्ता आणि बोपखेल मधील आरक्षित जागांचा विकास आदी महत्त्वपूर्ण प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (बुधवारी) प्रशासनाला दिले.

आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी महापालिका आयुक्तांबरोबर विशेष बैठक घेतली. नगरसेविका मीनल यादव, निकिता कदम, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहशहर राजन पाटील, नगररचना विभागाचे संचालक गणेश ठाकूर यांच्यासह सर्व प्रभागातील कार्यकारी अभियंता आदी यावेळी उपस्थित होते.

पिंपरी येथील बहुचर्चित भाजी मंडईचा विकास नव्या सुधारित मॉडेलनुसार स्मार्ट सिटीला अपेक्षित रचनेनुसार करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. त्यामध्ये भाजी मंडई, स्वतंत्र मच्छी मार्केट, मटण मार्केट, फ्रुट मार्केट आदींना सामावून घेण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी तातडीने अतिक्रमणे हटविणे, व विकासासाठी जागा ताब्यात घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याचबरोबर मिलिंदनगर येथील रखडलेल्या दोन इमारतींच्या सदनिकांचे वाटप करणे आणि परिसरात झालेले अतिक्रमण हटविण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. पिंपरी येथील स्मशानभूमी ते सुभाषनगर या डीपी रस्त्याची अंमलबजावणी करून काळेवाडी वरून थेट शगून चौकात येणारा वाहतूकीचा ताण सोडविण्याच्या प्रश्नावर यावेळी चर्चा झाली.

बोपखेल येथील बावीस पैकी फक्त दोन आरक्षणे पालिकेच्या ताब्यात आली असून त्यामुळे या गावाचा रखडलेला विकास व शहराच्या दृष्टिक्षेपात या भागाला आणण्याचा आमदारांच्या भूमिकेला आयुक्तांनी सहमती दिली. मोरवाडी येथे पुण्यातील गणेश कला क्रिडा मंचाच्या धर्तीवर भव्य रंगमंच उभारण्याच्या प्रस्तावावर यावेळी चर्चा झाली. तसेच संत तुकाराम नगर येथील डॉ. आंबेडकर स्टेडियम हे इनडोअर स्वरूपात उभारल्यास विविध क्रिडा खेळांना या मैदानाचा लाभ होईल या विषयावर आयुक्तांनी सहमती दर्शवून याप्रश्नी वास्तूविशारदाची नियुक्ती करण्याच्या सुचना प्रशासनास दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.