Pimpri: सुरक्षेला धोका असलेल्या वीजयंत्रणेच्या तक्रारी करा आता ‘व्हॉटस्पॲपवर’

Complain of power system safety hazards now on WhatsApp : सुरक्षेला धोका असलेल्या वीजयंत्रणेच्या तक्रारी करा आता 'व्हॉटस्पॲपवर'

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे, अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती देण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी महावितरणने नागरिकांना मोबाईलद्वारे व्हॉटस्पॲपवरचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी याबाबत परिपत्रक काढले असून ‘व्हॉटस्पॲपवर’द्वारे प्राप्त झालेल्या फोटो माहिती / तक्रारींनुसार वीजयंत्रणेची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी. तसेच याबाबत संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी 7875767123 तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी 7875768074 हा ‘व्हॉटस्पॲपवर’ मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या क्रमांकावर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याच्याच फोटोसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. या मोबाईल क्रमांकावर नागरिकांना कॉल करू नये. फक्त ‘व्हॉटस्पॲपवर’द्वारे माहिती द्यावी, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच ज्या नागरिकांकडे ‘व्हॉटस्पॲपवर’ नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.

महावितरणची वीजतार तुटलेली आहे, झोल किंवा जमीनीवर लोंबळकत आहे. फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडी किंवा तुटलेले आहे तसेच रोहित्रांचे कुंपण उघडे आहे.

खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे अशाच स्वरुपाची माहिती / तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधीत स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून व शक्य असल्यास स्थळाच्या लोकेशनसह नागरिकांनी ‘व्हॉटस्पॲपवर’च्या मोबाईल क्रमांकावर पाठवता येणार आहे.

यासोबतच अशा स्वरुपाच्या तक्रारींसाठी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर देखील सध्या सुरु असलेली सेवा उपलब्ध राहील.

‘व्हॉटस्पॲपवर’द्वारे महावितरणच्या मोबाईल क्रमांकावर आलेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधीत विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येणार आहे.

तक्रारीनुसार वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधीत तक्रारकर्त्यांना ‘व्हॉटस्पॲपवर’द्वारेच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येणार आहे.

नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे.

महावितरणच्या या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन वीजसुरक्षेसाठी वीज वितरण यंत्रणेतील धोके कमी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.