Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातील तक्रार पेट्या तक्रारींच्या प्रतीक्षेत

एमपीसी न्यूज – महिलांवरील अत्याचार, चो-या आणि अन्य प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी ऑक्टोबर महिन्यात फिरती तक्रार पेटी ही संकल्पना सुरु केली. मात्र तक्रार पेटी वारंवार फिरती राहिल्याने तक्रारींना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एका ठिकाणी दोन दिवस आणि काही दिवसांनी आठवडाभरासाठी तक्रार पेटी ठेवण्याचे ठरले. तक्रार पेटी आठवडाभर एका जागेवर ठेवली तरीही नागरिकांनी त्याकडे दुर्लक्षच केले. तक्रारींच्या प्रतीक्षेत असलेल्या तक्रार पेट्या नागरिकांचा प्रतिसाद नसल्यामुळे काढून ठेवण्यात आल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सुमारे 100 तक्रार पेट्या लावण्यात आल्या. त्यामध्ये वाकड, चिंचवड, निगडी, सांगवी, रहाटणी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, मोशी या भागात जास्त लक्ष देण्यात आले. तक्रार पेटी लावताना पोलीस त्या भागातील विद्यार्थी आणि नागरिकांची, शाळा, सोसायटींमध्ये बैठक घेत. त्यामध्ये त्यांना तक्रार पेटीचा उपयोग समजावून सांगितला जात होता. नागरिकांनी नावाने किंवा निनावी तक्रार त्या पेटीमध्ये टाकायची. ठराविक कालावधीनंतर ही पेटी पोलीस ठाण्यात नेऊन उघडली जात. तक्रार पेटीत आलेल्या तक्रारींची पोलीस प्रशासन तात्काळ दखल घेत असे. आजवर अगदी किरकोळ तक्रारी या तक्रार पेट्यांच्या माध्यमातून पोलिसांकडे आल्या आहेत. त्यांची देखील पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.

पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाचे सुरुवातीला नागरिकांमधून कौतुक झाले. मात्र उपक्रम सुरु झाल्यानंतर नागरिकांनीच त्याकडे पाठ फिरवली. शहरात मोठ्या प्रमाणात रहिवासी वसाहती आहेत. त्या प्रत्येक वसाहतीमध्ये पोलिसांना दररोज जाणे शक्य नाही. पण त्यांच्या अडचणी जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तक्रार पेट्यांच्या माध्यमातून पोलीस आणि नागरिक यांचा संवाद वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत सर्व तक्रार पेट्यांमधील तक्रारींचा आकडा चाळीशीच्या पुढे देखील गेला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाला जो संवाद अपेक्षित होता, तो साधला गेला नाही.

शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या अडचणी आहेत. या अडचणी मागील काही वर्षांपासून सुरु आहेत. यामुळे वसाहतींमध्ये राहणा-या नागरिकांना आणि महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिकांच्या रस्त्यावरील, चौकांमधील, कार्यालय परिसरातील तसेच अन्य ठिकाणच्या अडचणी आहेत. पण तक्रार देण्यास नागरिक पुढे येत नाहीत. त्यांची तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी या फिरत्या तक्रारपेटीची मदत होणार आहे. कदाचित पोलीस नागरिकांपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे तक्रार पेट्यांची जनजागृती म्हणावी तशी झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी याकडे कानाडोळा केला असल्याचे चित्र आहे.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “तक्रार पेट्यांची संकल्पना यापुढे देखील राबविण्यात येणार आहे. सध्या ही संकल्पना राबविताना येणा-या अडचणी लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करून पुन्हा ही योजना राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, कार्यालये, वसाहती, मॉल, चित्रपट गृहे, सार्वजनिक ठिकाणांमध्ये या तक्रार पेट्या लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी त्यांच्या समस्या न घाबरता मांडाव्यात हा यामागील उद्देश आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.