Pimpri : रिक्षाच्या पार्किंगवरून हाणामारी; 18 जणांना अटक व सुटका

एमपीसी न्यूज – रिक्षा पार्क करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी 18 जणांना अटक करीत परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना पिंपरीतील विठ्ठलनगर परिसरात घडली.

लक्ष्मी रामास्वामी अलकुंटे (वय 32, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी व्यंकटेश देवकर (वय 50), रवींद्र टाकळे (वय 40), राजु कुऱ्हाडे, सुवर्णा सतीश लष्करे, शांताबाई कुऱ्हाडे, भीमाबाई टाकळे, रमाबाई कुऱ्हाडे व मयुरी कुऱ्हाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याच्या परस्पर विरोधात रवींद्र लक्ष्मण टाकळे (वय 36) यांनीही पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साहिल पवार (वय 22), अक्षय भीमसिंग देवकर ऊर्फ बालक (वय 30), बालाजी अलकुंटे (वय 40), रामास्वामी अलकुंटे (वय 40), सागर कुऱ्हाडे (वय 22), सागर लष्करे (वय 28), बंटी देवकर (वय 30), मिरेकर (वय 18), संजय पवार (वय 50), अशोक हनुमंत देवकर (वय 42) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंच्या एकूण 18 आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांना जामिनावर सोडले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दोन्ही कुटुंबामध्ये रिक्षा पार्किंग करण्याच्या कारणावरून हाणामारी झाली. यामुळे पोलिसांनी बेकायदा जमाव जमविणे, हाणामारी करणे, शिवीगाळ करणे, या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.