Pimpri: ‘स्थायी’त मौन बाळगणा-या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार 

संतपीठाच्या विषयावर नव्हते मांडले म्हणणे; विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली तक्रार 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ उभारणीच्या पाच कोटी वाढीव खर्चाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समितीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी मौन बाळगले. या महत्वाच्या विषयावर विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आपले म्हणणे मांडणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही. याप्रकरणी स्थायी समितीतील पक्षाच्या चार नगरसेवकांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली असल्याची माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, गीता मंचरकर आणि प्रज्ञा खानोलकर हे चार नगरसेवक स्थायी समितीचे सदस्य आहेत. या चार नगरसेवकांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाचे नेते या नगरसेवकांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा अन् वारकरी सांप्रदायाचे पारंपारीक शिक्षण जनमाणसांना मिळावे, या उद्देशाने  महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे ‘संतपीठ’ उभारण्यात येत आहे. संतपीठासाठी महापालिकेने 40 कोटी रुपयांचा खर्च गृहित धरला असताना कंत्राटदारांनी जादा दराच्या निविदा भरल्या. त्याला पाच कोटी वाढीव रुपये देण्यात आले. असे एकूण 45 कोटीच्या प्रस्तावाला 21 डिसेंबर 2018 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या वाढीव खर्चाच्या प्रस्तावावर विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी आपले म्हणणे मांडणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी स्थायी समितीमध्ये मौन बाळगले.

स्थायी समितीची सभा संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी संतपीठाचा विषय तहकूब केल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र हा विषय मंजूर करण्यात आला होता. स्थायी समितीत तहकूब केल्याचे सांगितल्यानंतर विषय मंजूर कसा केला? यावर राष्ट्रवादीच्या स्थायीतील नगरसेवकांनी त्यानंतर भ्रशब्द देखील काढला नाही. आवाज उठविला नाही. शांत राहणेच पसंत केले. त्यामुळे त्यांच्या भुमिकेविषयी संशयकल्लोळ निर्माण झाला होता.

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, ”स्थायी समितीमध्ये संतपीठाच्या विषयावर भुमिका न घेणा-या पक्षाच्या चार नगरसेवकांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेऊन पक्षाचे नेतृत्व योग्य ती कारवाई करतील”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.