Pimpri : लोकप्रतिनिधींनी कामात अडथळा आणल्यास तात्काळ गुन्हा दाखल करा – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – लोकाभिमुख कामे करणे अधिकारी, कर्मचा-यांचे कर्तव्य आहे. नागरिकांची गैरसोय होता कामा नये अशा सक्त सूचना अधिका-यांना दिल्या आहेत. परंतु, काम करत असताना नगरसेवक, पदाधिकारी कोणीही कामात अडथळा आणल्यास कर्मचा-याने तत्काळ गुन्हा दाखल करावेत. प्रशासन कर्मचा-याच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी ग्वाही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांना सातत्याने लोकप्रतिनिधींकडून त्रास दिला जातो. अपमानित केले जाते. त्यामुळे अधिकारी नाऊमेद होतात. राजकीय दबावामुळे लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल केले जात नाहीत. त्यामुळे नगरसेवकांची मजल वाढली आहे. अधिका-यांना कोंडून ठेवले जात आहे.

त्या पार्श्वभुमीवर बोलताना आयुक्त हर्डीकर म्हणाले, “काम करताना नगरसेवक, पदाधिकारी वेठीस धरत असल्यास कर्मचा-यांनी तात्काळ गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. अधिका-यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे मागे उभे राहील. अधिकाऱ्यांना वारंवार अशा प्रकारांचा सामना करावा लागत असेल. तर, त्यांनी गुन्हा दाखल करावा. त्यांच्या पाठीमागे प्रशासनाचा प्रमुख म्हणून उभे राहण्याची माझी जबाबदारी आहे. यासंदर्भात सर्व विभागप्रमुखांना निर्देश देण्यात आले आहेत”

यापुढे लोकप्रतिनिधी अथवा कोणाताही बडा पदाधिका-याने गैरवर्तन केले. तर कर्मचा-यांनी गुन्हा दाखल करावा. कचखाऊ भूमिका घेऊ नये. तशा सूचना अधिकारी, कर्मचारी आणि कर्मचारी महासंघाला दिल्या आहेत, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.