Pimpri: ‘आरटीई’च्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा – अनुराधा गोरखे

Complete the admission process of RTE students - Anuradha Gorkhe

एमपीसी न्यूज – ‘आरटीई’ कायद्यांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश निश्चित झाला आहे. त्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत नगरसेविका गोरखे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरातील सर्वच शाळा ऑनलाईन सुरु झाल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना सरकारने आरटीईमधून शाळा प्रवेश दिला आहे. त्याचे पत्र सरकारने शाळांना दिले आहे. पण, शाळाप्रवेश फक्त कागदावर आहे. त्यापुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करुन घेणे आवश्यक होते.

तथापि, यापुढची संपूर्ण प्रक्रिया सरकारने थांबवली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण तसेच विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप चालू झाले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना अजून आपला कुठल्या शाळेत प्रवेश निश्चित झाला आहे, हेच माहित नसेल तर त्यांचे सध्या शैक्षणिक वर्षातले हे मोठे नुकसान ठरू शकते.

त्यामुळे महापालिकेने त्वरित निर्णय घेऊन ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश ‘आरटीई’द्वारे निश्चित झालेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी विनंती गोरखे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.