Pimpri : टपाल तिकिटांचे संग्रह करणाऱ्या कलाकाराकडून श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी (दि. 17) रात्री निधन झाले. त्यानंतर, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आठवणी सांगितल्या. अशीच एक आठवण टपाल तिकिटांचे संग्रह करणाऱ्या संदीप बोयत या कलाकाराने ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितली. डॉ. लागू यांची लोकांना भेटण्याची आत्मीयता आणि एकूणच लागू यांची स्वभावैशिष्ट्ये त्यांनी सांगितली आहेत.

संदीप बोयत यांना टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद आहे. मागील सात वर्षांपासून ते टपाल तिकिटांचा संग्रह करीत आहेत. मराठी संत, कलाकार, हिंदी कलाकार, दक्षिण भारतातील कलाकार यांच्यावर काढण्यात आलेल्या टपाल तिकिटांचा त्यांनी संग्रह केला आहे. टपाल तिकिटांच्या संग्रहासाठी त्यांची 2016 साली इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि 2019 साली लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

संदीप चित्रपटांचे मोठे फॅन आहेत. त्यातल्या त्यात डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिकेने तर त्यांना भुरळ घातली आहे. पिंजरा, सामना, सिंहासन, मुक्ता या मराठी चित्रपटांमधील तसेच नटसम्राट या नाटकातील त्यांनी साकारलेल्या भूमिका त्यांना विशेष आवडतात. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर त्यांनी डॉ. श्रीराम लागू यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

डॉ. श्रीराम लागू यांची भेट घेण्यासाठी केलेला खटाटोप सांगताना ते म्हणाले, “डॉ. श्रीराम लागू यांचा अभिनय आवडत असे. त्यांना एकदा तरी भेटण्याची प्रबळ इच्छा होती. पण भेटणार कसे, हा मोठा प्रश्न होता. ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे त्यांचे शेवटचे नाटक होते. त्यानंतर, त्यांना नाट्यगृहात जाऊन भेटता येणंदेखील शक्य नव्हतं. अनेकांना फोन करून प्रत्यक्ष भेटून डॉ. लागू यांच्या घरचा फोन क्रमांक मिळवला आणि फोन केला.

डॉ. लागू यांच्या घरी फोन केल्यानंतर त्यांच्या पत्नी दीपा लागू यांनी फोन उचलला. डॉ. लागू यांना भेटण्याची इच्छा त्यांनी सांगितली. तसेच आपण चित्रपट कलाकारांवर आधारित टपाल तिकिटांचा संग्रह केला आहे. त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असल्याचे सांगितले. पण डॉ. लागू यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे पहिल्यांदा दीपा लागू यांनी भेटण्याचे टाळले. तसेच डॉ. लागू यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर त्यांना भेटता येईल, अशी आशा देखील त्यांनी दाखवली.

त्यामुळे संदीप यांनी पुन्हा काही दिवसांनी लागू यांच्या घरी फोन केला. पुन्हा फोन डॉ. लागू यांच्या पत्नी दीपा लागू यांनी उचलला. यावेळी मात्र, त्या भेटण्यासाठी नकार देऊ शकल्या नाहीत. त्यांनी संदीप यांना भेटण्यासाठी बोलावले. संदीप डॉ. लागू यांच्या पुण्यातील घरी जाऊन भेटले. त्यांना संग्रहित केलेली टपाल तिकिटे दाखवली. आजारी असताना देखील डॉ. लागू यांनी तब्बल दोन तास संदीप यांच्याशी गप्पा मारल्या. टपाल तिकिटांचा संग्रह त्यांना फार आवडल्याचे देखील सांगितले. ‘संदीप तू एक इतिहास जपून ठेवला आहे’ हे डॉ. लागू यांचे वाक्य संदीप आज अभिमानाने सांगतात. दीपा लागू यांना देखील टपाल तिकिटांचा संग्रह आवडला असल्याचे संदीप सांगतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.