Pimpri: सीमाभिंत कामकाजात दिरंगाई; महापालिका उपअभियंत्याची खातेनिहाय चौकशी

एमपीसी न्यूज – पुनावळे येथील आरक्षणाखाली विकसित करण्यात येणा-या उद्यानाच्या सीमाभिंतीच्या कामकाजात इतर विभागाशी समन्वय न राखता दिरंगाई करणा-या महापालिका उपअभियंत्यावर कारवाई करण्यात आली आहे. काम वेळेत पूर्ण करून घेण्याची दक्षता न बाळगणा-या अभियंत्याची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

सुनिलदत्त लहानू नरोटे असे खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आलेल्या उपअभियंत्याचे नाव आहे. पिपरी – चिंचवड महापालिका आस्थापनेवर गट ब च्या महत्वाच्या उपअभियंता या पदावर स्थापत्य विभागात नरोटे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पुनावळे येथीरल आरक्षणाखालील उद्यान विकसित करण्याचे महत्वपूर्ण कामकाज सोपविण्यात आले आहे. हे काम देव कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला एक वर्षाच्या मुदतीकरिता अटी-शर्तींसह कामकाजाचे आदेश देण्यात आलेले आहेत.

या कामामध्ये उद्यान विकसित करण्यासाठी उद्यानात सीमाभिंत बांधण्याच्या कामाचा समावेश आहे. विकसित करण्यात येत असलेल्या या उद्यान आरक्षणाच्या दोन्ही बाजूस स्थापत्य विभागामार्फत 18 मीटर विकास आराखड्यातील रस्ता, पदपथ, ड्रेनेज आणि रस्त्याचे डांबरीकरण आदी स्वरूपाचे कामकाज करण्यात येत आहे. उद्यानाच्या सीमाभिंतीच्या कामकाजात इतर विभागाशी समन्वय न राखल्याने अक्षम्य दिरंगाई झाल्याची बाब निदर्शनास आली. हे कामकाज मुदतीत पूर्ण करून संबंधित विभागाशी समन्वय राखण्याची जबाबदारी नरोटे यांची होती. मात्र, त्यांनी हे काम मुदतीत पूर्ण केले नाही. परिणामी, ठेकेदारास भाववाढ द्यावी लागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेस आर्थिक बोजाही सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

नरोटे यांनी अन्य विभागाशी समन्वय राखल्याचे दिसून येत नाही. नरोटे यांनी कर्तव्यात कसूर केल्याची बाब सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे. कामकाजात हलगर्जीपणा करून अक्षम्य दिरंगाई केल्याचे तसेच काम वेळेत पूर्ण करून घेण्याची दक्षता न बाळगल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. नरोटे यांच्यावर 15 दिवसात दोषारोपपत्र ठेवण्याची कार्यवाही विभागाने करावी. विलंब झाल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.