Pimpri:  जैव वैद्यकीय कचरा प्रकल्प उभारणीसाठी निविदा प्रकिया राबवा – अण्णा बनसोडे  

Conduct tender process for setting up of biomedical waste project - Anna Bansode

एमपीसी न्यूज – जैव वैद्यकीय कचरा अर्थात बायो मेडिकल वेस्ट नष्ट करण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे प्रकल्प उभारणी करणे. त्याचे संचालन 15 वर्षे करणे हे काम पास्को या ठेकेदार कंपनीस देण्याबाबतचा प्रस्तावास स्थायी समिती मान्यता दिली असून तो  महासभेत  मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव रद्द करून नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आमदार आणा बनसोडे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे की,  शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालये व दवाखान्यामधून निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा गोळा करताना मोठा भ्रष्टाचार सुरु आहे.

करारनाम्यातील अटी-शर्तीचा व शब्द रचनेचा फायदा घेऊन प्रशासन ठेकेदारावर उदार होऊन कोणतीही निविदा प्रक्रिया न  राबविता 15 वर्षे एवढ्या दीर्घ कालावधीसाठी पास्को या ठेकेदार कंपनीस ठेका देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रकरणी टेंडर काढण्यात यावे.

हा प्लांट मोशी येथे स्थलांतर करून 15 वर्षे एवढ्या दीर्घ मुदतीने संचालणासाठी त्याच ठेकेदार कंपनीस देण्याचा उद्देश काय? पारदर्शक व स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबविता करारनाम्यातील अटी शर्तीचा व शब्द रचनेचा फायदा घेऊन प्रशासनाने हा प्रस्ताव स्थायी व महासभेत समोर ठेवण्याचा हेतू काय? निविदा प्रक्रिया न राबविल्याने पालिकेचा काय व किती फायदा होणार आहे हे शहरातील नागरिकांना अवगत करावे? असा खुलासा आमदार बनसोडे यांनी मागविला आहे.

भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याचा या प्रकरणी दबाव असल्याची चर्चा प्रशासकीय यंत्रणेत आहे. पालिका प्रशासनाने अशा प्रकारे शासनास अंधारात ठेऊन स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबविता ठेकेदारास काम देणे योग्य नाही.

करारनाम्यातील अटी व शर्तीचा फायदा घेऊन  भ्रष्टाचार सुरु आहे. असा प्रकार थांबला पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याबाबतही मागणी केली असल्याची माहिती आमदार बनसोडे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1