Pimpri: ‘आत्मविश्वासा’ने कोरोनावर मात; कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाची भावना

वायसीएममध्ये योग्य उपचार; अधिकारी, कर्मचारी वाढवितात मनोबल

एमपीसी न्यूज  (गणेश यादव) – कोरोना विषाणूचा आजार गंभीर नाही. आत्मविश्वासाने कोरोनावर मात करता येते, त्याची लढाई आपण जिंकू शकतो असा विश्वास ‘कोरोना’मुक्त झालेल्या रुग्णाने ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना व्यक्त केला. वायसीएम रुग्णालयात अतिशय योग्य उपचार झाले. डॉक्टर, नर्स सर्व कर्मचारी रुग्णांशी आत्मियतेने संवाद साधतात. मनोबल वाढवितात. तसेच सर्वांनी ‘सोशल डिस्टन्स’ ठेवणे अतिशय गरजेचे आहे. नागरिकांनी त्याचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले.

पिंपरी भागातील रहिवाशी असलेल्या 34 वर्षीय युवकाला 7 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. 14 दिवसांचे उपचार घेऊन ते कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी (दि.22) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी ‘एमपीशी न्यूज’शी बोलताना आपला अनुभव सांगितला.

ते म्हणाले, ताप, सर्दी, खोकला ज्यांना आहे, अशा लोकांनी स्वत:हून पुढे येवून आरोग्याची तपासणी करुन घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यानुसार माझ्यासह काही मित्रांनी कोरोनाची तपासणी करुन घेतली. यामध्ये बाकीच्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. पण, मी एकटा पॉझिटीव्ह आलो होते. पॉझिटीव्ह आल्याचे समजताच माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. सर्दी, खोकला, ताप नसतानाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यावेळी महापालिकेच्या डॉक्टरांनी मला धीर दिला. माझ्या कुटुंबियांची तपासणी केली असता त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. त्यामुळे माझा ताण कमी झाला होता.

वायसीएममध्ये 14 दिवस माझ्यावर चांगले उपचार झाले. कोणतीही कमतरता पडू दिली नाही. डॉक्टर, नर्स सर्व कर्मचा-यांनी मनापासून सेवा केली. रुग्णांशी आत्मितेयतेने संवाद साधत होते. सर्वांना धीर दिला जातो. मनोबल वाढविले जात होते. औषधांची कमतरता भासू दिली नाही. सर्वांना आत्मविश्वास दिला. त्यामुळे दोन दिवस उपचार घेतल्यानंतर हा कोणता गंभीर आजार आहे, असे वाटले नाही. यातून कोरोनाची लढाई जिंकू शकतो, असा विश्वास आमच्यात निर्माण झाला होता.

हा आजार जीवघेणा नाही, त्यातून 100 टक्के बरे होवू शकतो, असा विश्वास आम्हाला दिला होता. रुग्णालयात उपचार घेत असताना सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, सायंकाळी नाष्टा, रात्री जेवण असा पौष्टिक आहार दिला जात होता. साफसफाई ठेवली जात होती. सकाळी लवकर उठविले जात होते. सर्वांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची शिस्त लावली जात होती. माझ्यासोबत असलेले 12 रुग्ण टप्या-टप्प्याने कोरोनामुक्त होत आहे. सात जणांचा डिस्चार्ज झाला आहे. शहरात रुग्ण वाढत असले. तरीही खबरदारी, योग्य वेळी निदान आणि तातडीने उपचार, मानसिक आधार यामुळे आमची भीती संपली होती.

जे नवीन रुग्ण रुग्णालयात येत होते. त्यांनाही आम्ही काही कालावधीनंतर धीर देत होतो. त्यांची भीती कमी करत होतो. उपचार सुरु असलेले रुग्ण नवीन रुग्णांना धीर देतात. सुरुवातीला काहीजण गोळ्या घेण्यास नकार देत होते. परंतु, समजून सांगितल्यावर सर्व रुग्ण नियमित गोळ्या घेतात.

महापालिकेचे डॉक्टर, नर्स, अधिका-यांचे आभार मानावेत तेवढे कमीच!
महापालिकेचे सर्व अधिकारी, परिचारिका, सफाई कर्मचारी कोरोनाच्या रुग्णांशी आत्मियतेने संवाद साधतात. धीर देतात. त्यांनी आत्मविश्वास दिल्यानेच मी कोरोनामुक्त झालो आहे. त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. ते रात्रंदिवस डोळ्यात तेल टाकून काम करत आहेत. त्यांना सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. कोरोना बाधित रुग्णांवर सर्वांत चांगले उपचार पिंपरी-चिंचवड शहरात होत आहेत.

नागरिकांनी काही दिवस घरी बसणे फार गरजेचे आहे. आजारी लोकांनी घराबाहेर पडू नये. ज्यांच्या घरात रुग्ण आहेत. त्यांनी तर बाहेर येणे कटाक्षाने टाळावे. 15 ते 20 दिवस घराबाहेर पडण्याचे टाळल्याने काहीही फरक पडणार नाही. परंतु, जर टाळले नाही तर खूप काही होऊ शकतं, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.