Pimpri: आमदार लक्ष्मण जगताप यांना भाजप नगरसेवकाकडून ‘घरचा आहेर’

Congratulations to MLA Jagtap for noticing inefficiency of Commissioner - Sandeep Waghere आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रावर भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांची उपहासात्मक टिप्पणी

एमपीसी न्यूज – शहरातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आयुक्त श्रावण हर्डीकर अपयशी ठरले आहेत. आयुक्तांमुळे भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगत विविध सव्वीस प्रश्न भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना पत्राद्वारे विचारले आहेत. जगताप यांनी आम्ही गेल्या तीन वर्षापासून उपस्थित करत असलेले प्रश्न आयुक्तांना विचारल्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करून आभार मानतो, असे त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

नगरसेवक वाघेरे यांनी म्हटले आहे की, पालिकेत आयुक्त  श्रावण हर्डीकर यांना नियुक्त होऊन तीन वर्ष तीन महीने होत आहेत. कोठेही सनदी व शासकीय अधिकारी एकाच जागेवर तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठेऊ नये असा राज्य शासनाचा नियम आहे. त्यातच शहरातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात आयुक्त अपयशी ठरले आहेत.  रुग्ण दुप्पटीचा कालावधी दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. म्हणजे शहरात कोरोना नियंत्रित ठेवण्यास सपशेल अपयश आले आहे. या अपयशाची बक्षिसी म्हणून त्यांना पालिकेत मुदतवाढ दिली आहे का ? असा सवाल मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांना ईमेल करून त्यांच्या बदलीची मी मागणी केली होती.

आयुक्तांच्या बोटचेपी भूमिकेमुळे  सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांना खतपाणी मिळाले आहे. निविदा मान्य करताना निविदा दरांमध्ये तफावत ठेऊन निविदा संशयास्पद मंजूरी दिली. पालिकेत गेल्या तीन वर्षात कुठलीही भरीव कामगिरी न केल्यामुळे व अनेक प्रकल्प रखडले आहेत.  आयुक्तांच्या संदिग्ध भूमिकेमुळे भाजपची भूमिका जनतेत अविश्वास निर्माण करणारी ठरत आहे. असे अनेक विषय आम्ही वारंवार उपस्थित केले. सर्वसाधारण सभेतही मांडले.

शहरातील महत्वाचे असलेले वायसीएम रुग्णालय व वैद्यकीय विभागातील गैरकारभार आम्ही वेळेवेळी लेखी पत्राद्वारे मांडला. सभागृहतही उपस्थित केला. पालिकेच्या नवीन इमारतीची निविदा प्रक्रिया संशयास्पद असल्याचे आम्ही लेखी पत्राद्वारे सिद्ध केले. आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपस्थित केलेल्या सव्वीस प्रश्नामध्ये आम्ही गेले तीन वर्षात उपस्थित केलेले बहुतांश प्रश्न आहेत.

याची दखल घेत आमदार जगताप यांना आयुक्तांची अकार्यक्षमता ते जात असताना उशिरा का होईना निदर्शनास आली. याबद्दल आम्ही आमदार जगताप यांचे आभारी आहोत, असे नगरसेवक वाघेरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.