Pimpri: आंदोलनामुळे शहरात काँग्रेसचे अस्तित्व

(गणेश यादव)

सन 2018 संपून आता लवकरच 2019 मध्ये आपण प्रवेश करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता उलथवून भाजपने मुसंडी घेत पिंपरी- चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज केली. मात्र मागील वर्षभराच्या काळात आपल्या कामामुळे भाजपचा शहरातील जनतेवर प्रभाव पडला आहे का ?, यापूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा सरस कामगिरी करीत आपल्या कार्यशैलीची चुणूक भाजपने दाखवली आहे का ? सध्या विरोधी पक्ष म्हणून असलेल्या राष्ट्रवादीला भाजपच्या कारभारावर अंकुश ठेवण्यात किती यश आले आहे ?, काँग्रेस, शिवसेना मनसे या पक्षांचे शहरातील अस्तित्व दखल घेण्याजोगे आहे का ? या सर्व बाबींवर प्रकाशझोत टाकणारी एक मालिका सुरु केली आहे. त्याचा हा तिसरा लेख…..

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहात एकही नगरसेवक नसला तरीही केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात सातत्याने आंदोलन करत काँग्रेसने शहरात आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. सरत्या वर्षात काँग्रेसने विविध प्रश्नांवर शंभरहून अधिक आंदोलने केली आहेत. त्याच्या माध्यमातून काँग्रेसने आपली शहरातील ‘व्होट’ बँक जपली आहे. पक्षासाठी मशागत करुन ठेवली असून आगामी निवडणुकीच्या वर्षात काँग्रेसला याचा कितपत फायदा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. मात्र, दिवंगत शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर शहराकडे काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे शहरातील काँग्रेसची ताकद कमी झाली. परिणामी, महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांचे संख्याबळ कमी होत शून्यावर आले आहे. त्यामुळे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. परंतु, नेतृत्वाने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाल्यापासून अनेक वर्ष काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून शहराकडे पाहिले जात होते. दिवंगत शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याने शहराकडे लक्ष दिले नाही. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस शहराचे संपर्कप्रमुख होते. मात्र, त्यांनी म्हणावे तसे शहराकडे आणि पक्षसंघटनेकडे लक्ष दिले नाही. शहरात काँग्रेसची आजही ताकद आहे. झोपडपट्टीतील रहिवाशी, मध्यमवर्गीय समाज काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे. मात्र मतदार स्वत:कडे टिकवून ठेवणारे सक्षम नेतृत्व शहर काँग्रेसला मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसचा मतदार राष्ट्रवादीसह इतर पक्षाकडे वळत आहे.

काँग्रेसचा महापालिकेत एकही नगरसेवक नाही. शहरात काँग्रेसचे संघटन कमकुवत झाले आहे. कार्यकर्ते पक्षापासून लांब जात आहेत. पक्षासाठी प्रतिकूल परिस्थिती असून पक्षाचा काळ कठीण आहे. त्यामुळे पक्षाचे काम करणे जिकिरीचे होते. या कठीण परिस्थितीत सचिन साठे यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली. केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने करत त्यांनी शहरात पक्षाचे अस्तित्व जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या जन संघर्षयात्रेची पिंपळेगुरवमध्ये सभा झाली. वरिष्ठ नेत्यांनी सभेत मार्गदर्शन केले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. मध्यप्रदेश, राज्यस्थान, छत्तीसगड या तीनही राज्यात काँग्रेसची सत्ता आली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये जाण आली असून त्यांच्यातील मरगळ गेली आहे.

आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार मावळ, शिरुर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे आहेत. तर, भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे आहेत. तर, केवळ चिंचवड मतदार संघ काँग्रेसकडे येतो. त्यामुळे चिंचवडमधून काँग्रेसचा उमेदवार कोण असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.