Pimpri : काँग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदानासह गरजूंना मदत करावी – सचिन साठे

एमपीसी न्यूज : लॉकडाउनमुळे रोजंदारी व हातावर पोट असणाऱ्या गरीब नागरिकांना परिस्थितीशी जुळवून घेणे कठीण झाले आहे. अश्या गरजूवंत नागरिकांना अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तू , जेष्ठ नागरीक तसेच गरजुंना औषधे मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढे यावे तसेच आपल्या स्थानिक परिसरात रक्तदान शिबीराचे आयोजन करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन साठे यांनी केले आहे.

कोरोना व्हायरसमुळे देशभरात 14 एप्रिल पर्यंत लॉक डाउन करण्यात आले आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. पुणे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची गरज लक्षात घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्स ठेवून मनपा प्रशासन, पोलीस यांच्या परवानगीने रक्तदान शिबिर व गरीबांना मदत करावी. शक्य असेल तेथे कंपन्यांच्या सीएसआर फंडाची मदत घ्यावी. देश आत्ता खूप मोठ्या समस्येला सामोरा जात आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी देशभरातील डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका, लॅब टेकनिशीयन्स, सर्व्हे करणारे शिक्षक, सफाई कामगार, अत्यावश्यक सेवेतील कामगार, पोलिस बंधू , भगिनी जीवावर उदार होऊन कर्तव्य पार पाडत आहेत. शहरातील गरजू नागरिकांना जेवणाचे मोफत पॅकेट्स देण्यासाठी अनेक सामाजिक संस्थानी पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या समनव्ययाखाली काम सुरू केले आहे. त्यांच्यासमवेत काँगेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभाग घेत आहेत. तरीदेखील या कठीण प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपून काँगेसच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन सचिन साठे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.