Pimpri : बांधकाम कामगारांच्या मुलांच्या जीवाची पर्वा कुणाला ?

बांधकाम कामगारांसोबतच त्यांच्या मुलांचाही जीव धोक्यात, अनेक अपघाती घटनात चिमुकल्यांचा बळी

एमपीसी न्यूज – बांधकाम कामगारांच्या अपघाती मृत्युनंतर आता त्यांच्या चिमुकल्यांनाही आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे, बऱ्याच घटनात या लहान मुलामुलींचा अपघाती मृत्यु झाला आहे. दिघी येथील समर्थ रेसिडेंसी या बांधकाम साईटवरील पाण्याच्या टाकीत पडुन अवघ्या तीन वर्षांच्या रितु यादव या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला, यामुळे पुन्हा एकदा बांधकाम कामगारांच्या मुलांच्या जीवाची पर्वा कुणाला ? अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. अपघाती साईटवर कडक कारवाई करण्याची मागणी बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी कामगार उपआयुक्त व पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

प्रत्येक शहरात बांधकाम साईटची कामे जोरात सुरू असताना कामगार व त्यांच्या मुलांच्या सुरक्षेकडे जाणुनबुजुन दुर्लक्ष करण्यात येते, बांधकाम कामगारांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे साईटवर आई-वडिलांना दोघांनाही काम करणं गरजेचं असतं, अशावेळी त्यांच्या लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा असतो या लहान मुलांसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन बालवाडी व विविध उपाययोजना करणे त्या बांधकाम व्यावसायिकाला बंधनकारक असताना त्याकडे बरेचवेळा कानाडोळा करत दुर्लक्ष करण्यात येतं. उघडया अवस्थेत असलेल्या पाण्याच्या टाक्या, बालवाडी नसल्यामुळे साईटवर इतरत्र धोकादायक ठिकाणी मुलांचा वावर असल्या निष्काळजीपणामुळे लहान मुलांचे जीव जात आहेत, प्रत्येकाला मुलं-बाळं असतात पण यांच्या जीवाकडे का गांभीर्याने पाहिले जात नाही.

बांधकाम कामगारांना व त्यांच्या मुलाबाळांनाही सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार आहे मग त्यांचा जीव एवढा स्वस्त का ? पोटातील चिमुकल्यांचा जीव वाचविण्यासाठी देशात स्त्रीभ्रुण हत्या प्रतिबंध कायदा आमलात आला त्यात शासनाने ज्याप्रकारे कडक कायदे व शिक्षेची तरतुद करून या हत्या रोखल्या त्याचप्रकारे या लहान हसत्या-खेळत्या बालकांच्या अपघाती हत्याही प्रशासनाने रोखणे गरजेचे आहे अशी खंत जयंत शिंदे यांनी व्यक्त केली.

● दि. 18 मार्च 2017 रोजीही याच दिघी भागात पाण्याच्या टाकीत बुडुन सुमित अनिल चौहान या साडेतीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला होता.

● वडगाव बुद्रुक येथील विकासनगर येथे जान्हवी कुंबर वय अडीच वर्षे या चिमुकलीचा पाण्याच्या टाकीत पडुन मृत्यू

● दि. 26 नोव्हेंबर 2017 रोजी राहटणी यशवंतनगर येथे आयुष शंकर पवार या तीन वर्षांच्या बालकाचा पाणाच्या टाकीत पडून मृत्यू

● भोसरी येथील साईटवर पाण्याच्या टाकीत पडुन दोन बालकांचा मृत्यू

● फुगेवाडी येथील सिरवी माता मंदिराजवळील एका साईटवर लिफ्टच्या डक्टमध्ये पडुन चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू

अशा कित्येक घटना रोज घडत असताना कामगार विभाग प्रशासन व पोलीस प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करताना दिसत नाही तरी प्रत्येक अपघाती साईटवर कडक कारवाई करत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी बांधकाम कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.