Pimpri: रस्ते साफसफाईच्या ठेकेदारांना मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची रोडस्वीपर वाहनांद्वारे साफसफाईच्या कामाची मुदत संपली असताना त्यांनाच मुदतवाढ देण्याचा सपाटा लावला आहे. सव्वा वर्षात तिस-यांदा त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी काही कालावधी जाणार असल्याचे कारण देत नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याऐवजी पूर्वीच्याच दोन ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात येणार आहे. चार महिन्यांसाठी त्यांच्यावर 1 कोटी 40 लाख रूपये खर्च होणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची सफाई यांत्रिक पद्धतीने रोडस्वीपर वाहनाद्वारे करण्यात येते. केंद्राच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी सरकारकडील मंजूर निधीतून ही साफसफाई केली जाते. महापालिका मालकीची आठ वाहने आणि ठेकेदार मालकीची दोन अशा दहा रोडस्वीपर वाहनांचा त्यासाठी वापर होतो. ही दहाही वाहने वेगवेगळ्या क्षमतेची आहेत. या कामासाठी महापालिकेने डी. एम. एंटरप्रायजेस आणि बीव्हीजी इंडिया या ठेकेदारांची नेमणूक केली आहे. त्यांना चार कामांसाठी वाहनांच्या क्षमतेनुसार वेगवेगळे दर ठरवून देण्यात आले आहेत.

डी. एम. एंटरप्रायजेस हे महापालिका मालकीच्या सहा वाहनांमार्फत अंतर्गत रस्त्यांची तसेच पुणे-मुंबई महामार्गाची साफसफाई करतात. त्यांना 40 किलोमीटर कामासाठी प्रति किलोमीटर प्रति दिन 219 रूपये दर ठरविण्यात आला आहे. तर बीव्हीजी इंडीया हे महापालिका मालकीची चार वाहने आणि त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या दोन वाहनांद्वारे रस्त्यांची साफसफाई करतात. त्यांना या दोन्ही कामांसाठी अनुक्रमे 271 रूपये 50 पैसे आणि 298 रूपये 50 पैसे प्रति किलोमीटर प्रति दिन दर ठरविण्यात आला आहे.

नवीन निविदा प्रक्रियेसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय रोड स्वीपर वाहनांची आवश्‍यक संख्या तसेच रूट चार्ट आदी आवश्‍यक माहिती सध्या मागविण्यात येत आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे या ठेकेदारांना ठरवून दिलेल्या दरानुसार, 1 जानेवारी 2019 ते 30 एप्रिल 2019 या चार महिने कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याखेरीज महापालिकेने बीव्हीजी कंपनीकडून रोडस्वीपर मशिन खरेदी केली आहे. मशिन चालविण्याकरिता प्रति दिन प्रति शिफ्ट 9 हजार 225 रूपये आणि मशिन देखभाल-दुरूस्तीसाठी दर महा प्रति 34 हजार 500 रूपये बीव्हीजीला दिले जातात. या कामाची मुदतही संपुष्टात आल्याने त्यांनाही मुदतवाढ देण्यात येणार आहे. या कामासाठी 12 लाख रूपये खर्च होणार आहे.

डी. एम. एंटरप्रायजेस आणि बीव्हीजी इंडिया या ठेकेदारांची रस्ते सफाईच्या कामासाठी सुरुवातीला दोन वर्षे कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली होती. ही मुदत 30 नोव्हेंबर 2017 रोजी संपली. त्यानंतर त्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. अखेरची मुदतवाढ त्यांना 23 ऑक्‍टोबर 2018 रोजी देण्यात आली होती. आता ही मुदतवाढही 31 डिसेंबर 2018 रोजी संपुष्टात आली. सव्वा वर्षात दोनदा मुदतवाढ मिळूनही आता तिसऱ्यांदा मुदतवाढीचा घाट घातला जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही निविदा प्रक्रियेस विलंबाचे कारण पुढे करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.