Pimpri News: दहीहंडी, गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून पालिका प्रशासनाला सहकार्य करा – आमदार महेश लांडगे

संकटाच्या काळात आपण सर्वांनी एकोप्याने लढुया ; Cooperate with the municipal administration by avoiding unnecessary expenses during Dahihandi and Ganeshotsav - MLA Mahesh Landage

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी, गणेशोत्सवात होणारा अनावश्यक खर्च टाळून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला सर्वोतोपरी मदतीसाठी पुढाकार घ्यावा. या संकटाच्या काळात आपण सर्वांनी एकोप्याने लढुया, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागावर ताणाव निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या निर्देशानुसार, यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार नाहीत.

त्यामुळे दहीहंडी उत्सव मंडळाच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी बॅनर अथवा कार्यक्रमाचे आयोजन करु नये. तसेच, प्रशासनाने लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली आहे. जनजीवन पूर्ववत सुरू होत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत.

परिणामी, रुग्ण संख्या आणखी वाढण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे 200 दहीहंडी उत्सव मंडळे आहेत. हजारो कार्यकर्ते या उत्सवामध्ये प्रतिवर्षी सहभागी होत असतात.

मात्र, यावर्षी उत्सव होणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात आपण वास्तव्य करतो. महापालिका प्रशासन आपल्याला सोयी-सुविधा पुरवत आहे.

आता आपण समाजाला काहीतरी देणे लागतो. या भावनेतून महापालिका प्रशासनाला थेट सहकार्य करावे. कारण, आता प्रशासनाला आपल्या मदतीची गरज आहे.

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाचलेल्या खर्चातून महापालिका प्रशासनाला वस्तू स्वरुपात म्हणजे सॅनिटाईझर, पीपीई कीट, ॲटोमॅटिक सॅनिटाईझर मशीन, ऑक्सिजन सिलिंडर अशा स्वरुपात मदत करावी.

त्या मदतीचा वापर हा पिंपरी-चिंचवडकरांनाच होईल. कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल्स आणि संबंधित कार्यालयांमध्ये त्याची मदत होईल. त्यासाठी महापालिका प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी आपण संपर्क साधावा, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीनुसार मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मंडप उभारु नये. मोजक्या लोकांसोबत आरती घ्यावी.

मंदिरातच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. त्यामुळे यावर्षी अनावश्यक खर्च होणार नाही. यातून वाचलेले पैसे सामाजिक बांधिलकी म्हणून महापालिका प्रशसानाला मदत करावी.

तसेच, पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेवूया…‘निसर्ग गणेश’ सारख्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. शाडू मातीच्या मूर्ती, मातीच्या मूर्ती, तुरटीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे. तसेच, घरीच गणेश विसर्जन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

गणेशोत्सव वर्गणीसाठी आग्रह नको !

कोरोना आणि लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक, उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणीसाठी नागरिकांना आग्रह करु नये.

नवरात्रोत्सवातही कार्यकर्त्यांनी नागरिकांना वर्गणी आणि मदतीसाठी बंधकारक करु नये. त्यामुळे वर्गणीसाठी वाद-विवाद होणार नाहीत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.