Pimpri:’वायसीएमएच’मध्ये चांगले उपचार झाले, 15 दिवस मेडिटेशन, पुस्तकवाचन केले; कोरोनामुक्त रुग्णांची प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज – आम्ही कोरोना पॉझिटीव्ह होतो. आमच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अतिशय चांगले उपचार झाले. आम्ही 15 दिवस पूर्णपणे मेडिटेशन केले. पुस्तके वाचली, अशी प्रतिक्रिया ‘कोरोनामुक्त’ झालेल्या पहिल्या रुग्णांनी दिली आहे. नागरिकांनी घरी रहावे. नियमांचे पालन करावे. स्वतःची काळजी घ्यावी, व्यवस्थित पोषक आहार घ्यावा  असे आवाहनही या रुग्णांनी शहरवासीयांना केले. 

पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी हे तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. शहरातील कोरोनाबधित हे पहिले रुग्ण होते. या पहिल्या पॉझिटीव्ह तीन पुरुष रुग्णांचे 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (दि.25) त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर गुरुवारी (दि.26) पुन्हा एकदा  या तिघांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते.

या दुस-या तपासणीत देखील त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले.  त्यामुळे हे रुग्ण पूर्णपणे ‘कोरोनामुक्त’ झाल्याचे स्पष्ट झाले असून रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.