Pimpri : कोरोना इफेक्ट; आषाढी एकादशीनिमित्त चौघडा सम्राट रमेश पाचंगे यांचे घरीच चौघडा वादन

Corona effect; On the occasion of Ashadi Ekadashi, Chaughada Samrat Ramesh Pachange played Chaughada at home

एमपीसी न्यूज – दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त चौघडा सम्राट रमेश पाचंगे पंढरपूरला चंद्रभागेच्या काठावर बसून चौघडा वादनातून विठ्ठल भक्ती करतात. यावर्षी कोरोना विषाणूने सर्व हालचाली बंद झाल्याने त्यांनी यावर्षीची चौघडा वादनाची सेवा घरूनच विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली आहे.

पाचंगे यांनी आज (बुधवारी) सकाळी विठ्ठलाची पूजा मांडली. एकादशीची पूजा झाल्यानंतर त्यांनी तब्बल तीन तास चौघडा वादन केले.

रमेश पाचंगे वयाच्या दहाव्या वर्षापासून चौघडा वादन करतात. त्यांचे वडील देखील चौघडा वादन करीत होते. सध्या पाचंगे यांची पाचवी पिढी चौघडा वादनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

पाचंगे यांना आजवर तब्बल 587 विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये शहर पातळीवरील तसेच राज्यस्तरीय पुरस्कारांचा समावेश आहे.

पाचंगे कुटुंब वारकरी आहे. त्यामुळे ते दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त न चुकता पंढरपूरची वारी करतात. पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीच्या किनारी बसून ते चौघडा वाजवतात.

ही मंगल धून ऐकून जणू साक्षात विठ्ठल त्यांना दर्शन देतो, अशी भाविकांची धारणा आहे. मागील अनेक वर्षांपासून त्यांची चौघडा वादनाची परंपरा आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने पंढरपूर यात्रा अतिशय सध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे समस्त वारकरी आणि विठ्ठल भक्तांनी स्वागत केले.

घरात राहून विठ्ठल भक्ती करण्याचा निर्णय घेऊन सर्वजण घरातूनच विठ्ठलाचा नामजप करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.