Pimpri: ‘कोरोना’ विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक कोटीचे सुरक्षा कवच द्या’; महासंघाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य तसेच इतर विभागातील कर्मचा-यांच्या नेमणूका केल्या आहेत.  हे कर्मचारी वेळेचे कोणतेही बंधन न पाळता जीवावर उदार होऊन काम करत आहेत. त्यामुळे या कर्मचा-यांना विमा सुरक्षा कवच लागू करावे,  अशी मागणी कर्मचारी महासंघाने केली आहे.  

याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, महासचिव सुप्रिया सुरगुडे -जाधव यांनी महापौर उषा ढोरे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,   महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांना कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत विविध कामकाजासाठी नेमणूका केल्या आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी, कर्मचारी वेळेचे बंधन न पाळता जीवावर उदार होऊन कामकाज करत आहेत. नुकतेच पुणे महापालिकेतील कर्मचा-यांना एक कोटीचे सुरक्षा कवच आणि एखाद्या कर्मचा-याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास महापालिका सेवेत नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कोरोना विरोधात लढाई लढणा-या कर्मचा-यांना एक कोटीचे सुरक्षा कवच द्यावे. एखाद्या कर्मचा-याचा दुर्देवाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला महापालिका सेवेत नोकरी देण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.